सिंधुदुर्गातील ८४ गावांत 4G इंटरनेट सेवा सुरू होणार ; बीएसएनएलचा ५०० दिवसांचा “मास्टर प्लॅन”
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून माजी खा. निलेश राणेंचा पाठपुरावा
मालवणात २३ तर कुडाळात १२ गावांना मिळणार लाभ : भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती
मालवण | कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपर्कक्रांती करण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून माजी खासदार निलेश राणे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. माजी खा. राणेंच्या मागणीनुसार बीएसएनएलने केलेल्या सर्व्हेनुसार जिल्ह्यातील ८४ गावे अद्यापही इंटरनेट पासून वंचित असून या गावात 4G सेवा सुरू करण्यासाठी बीएसएनएलने ५०० दिवसांचा मास्टर प्लॅन तयार केला असून या कालावधीत सदरील गावात 4G मोबाईल सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी या गावात टॉवर उभारणीसाठी किमान २०० चौ. मीटर जागा उपलब्ध करून देण्याबाबत बीएसएनएलने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र सादर केले आहे. या अंतर्गत मालवण तालुक्यात २३ तर कुडाळ तालुक्यात १२ गावांना 4G सेवेचा लाभ मिळणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावे आजही बीएसएनएलच्या 4G सेवेपासून वंचित असून यामुळे संबंधित गावातील ग्रामस्थां बरोबरच शासकीय कामकाजातही अडथळे निर्माण होत आहेत. याबाबत भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी केंद्रीय लघु सूक्ष्म मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून दूरसंचार विभागाकडे पाठपुरावा करून सदरील बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार दूरसंचार विभागाने केलेल्या सर्वेत जिल्ह्यातील ८४ गावे अद्यापही 4G सेवेपासून वंचित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या गावात 4G मोबाईल सेवा सुरू करण्यासाठी ५०० दिवसांचा कालबद्ध आराखडा दूरसंचार विभागाने तयार केला आहे. त्या अंतर्गत या कालावधीत सदरील गावामध्ये आवश्यकता भासल्यास टॉवर उभारून 4G सेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे संबंधित ८४ गावात टॉवर उभारणीसाठी २०० चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्याबाबत दूरसंचार विभागाने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र सादर केले आहे. यामध्ये मालवण तालुक्यातील बिळवस, हिवाळे, गोळवण, शिरवंडे, असरोंडी, महान, आंगणेवाडी, अपराधवाडी, बागवेवाडी, भोगलेवाडी, चिंदर, डिकवल, जुवा पाणखोल, खोटले, कुडोपी, कुंभारवाडी, माळगाव, ओवळीये, पलीकडीलवाडी, त्रिंबक, वाडी डांगमोडे, वायंगवडे, वेरळ या गावांचा समावेश आहे. तर कुडाळ तालुक्यातील कवठी, पुळस, उपवडे, साकीर्डे, वासोली, शिवापूर, आंजीवडे, नेरूर, चाफेली, तुळसुली, भरणी, ओरोस खु. या गावांचा समावेश आहे.