भव्य रिक्षा रॅलीने पर्यटन महासंघाकडून मालवणात नारळी पौर्णिमा उत्सव साजरा
मालवण : ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सव गुरुवारी मालवणात उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या नारळी पौर्णिमा उत्सवाचे वैशिष्ट्य ठरले ते पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे रिक्षा व्यावसायिकांच्या सहकार्याने काढण्यात आलेली भव्य रिक्षा रॅली ! ८० हून अधिक रिक्षांच्या सहभागातून काढण्यात आलेल्या या तिरंगा रॅली मध्ये पर्यटन महासंघाचे पदाधिकारी, रिक्षा व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावर्षी कोरोनाचे सावट नसल्याने या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली होती. मालवणात मुसळधार पाऊस आणि वारे वाहत असल्याने या रॅलीबाबत प्रश्न उपस्थित झाला. मात्र भर पावसात भिजत पर्यटन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी ही रॅली यशस्वी करून दाखवली.
गुरुवारी दुपारी ३ वाजता पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे रिक्षा व्यावसायिकांच्या सहकार्याने भरड नाका ते बंदर जेटी पर्यंत रिक्षा रॅली काढून रिक्षा व्यावसायिकांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आला. या रॅलीत रिक्षा आकर्षक पद्धतीने सजविण्यात आल्या होत्या. या रॅलीचे उद्घाटन पोलीस निरीक्षक विजय यादव व रिक्षा संघटना अध्यक्ष पपू कद्रेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तर बंदर जेटी येथे रिक्षा व्यवसायिकांच्या वतीने पपू कद्रेकर यांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले. यावेळी पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर, तालुकाध्यक्ष अविनाश सामंत, शहराध्यक्ष मंगेश जावकर, शेखर गाड, सुधीर धुरी, मेघा सावंत, अन्वेषा आचरेकर, मिलिंद झाड, राजन परुळेकर, पूजा वेरलकर, श्वेता सावंत, किशोर दाभोळकर, मातृत्व आधारचे संतोष लुडबे, तारकर्ली पर्यटन संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, दादा वेंगुर्लेकर आदी व इतर व्यावसायिक उपस्थित होते.