यंदाच्या नारळी पौर्णिमेला मालवणात प्रथमच नारळाच्या भव्य प्रतिकृतीसह रिक्षांची रॅली
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचा अभिनव उपक्रम
महासंघाच्या वतीने सागराचा श्रीफळ अर्पण करण्याचा बहुमान यंदा रिक्षा संघटनेला
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण मध्ये साजऱ्या होणाऱ्या ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांना व व्यावसायिकांना सामावून घेण्यात येणार आहे. ११ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेनिमित्त मालवणातील रिक्षा संघटनांच्या सहकार्याने मालवण शहरातून रिक्षांची भव्य रॅली काढण्यात येणार असून यावर्षी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्यावतीने सागराला श्रीफळ अर्पण करण्याचा मान रिक्षा व्यावसायिक संघटनेला देण्यात येणार आहे. हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येणार असून प्रत्येक वर्षी मालवणातील विविध व्यापारी वर्गाच्या घटकांना श्रीफळ अर्पण करण्याची संधी देण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण येथील रुचिरा हॉटेल मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाची पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर, तालुकाध्यक्ष अविनाश सामंत, शहरअध्यक्ष मंगेश जावकर, शेखर गाड, रिक्षा व्यावसायिक संघटनेचे पप्या कद्रेकर, हेमचंद्र कोयंडे, संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर यांसह रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते. यावेळी बाबा मोंडकर म्हणाले, मालवण शहर पर्यटनदृष्ट्या देश विदेशात पोहचले आहे. ऐतिहासिक परंपरा लाभलेला येथील नारळी पौर्णिमा उत्सव देखील पर्यटकांपर्यंत पोहचावा या दृष्टीने ११ ऑगस्ट रोजी पर्यटन व्यावसायिक महासंघामार्फत व्यापारी वर्गाला एकत्र करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये यावर्षी रिक्षा व्यावसायिकांना सामावून घेण्यात आले असून रिक्षा व्यावसायिकांना सागराला श्रीफळ अर्पण करण्याचा मान देण्यात आला आहे. यानिमित्त नारळी पौर्णिमे दिवशी मालवणची ग्रामदेवता श्री देव रामेश्वरास श्रीफळ ठेवून दुपारी ३ वाजता मालवण भरड नाका ते मालवण बंदर जेटी अशी रिक्षांची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. यात एक मुख्य रिक्षा सजवून त्यावर नारळाची भव्य प्रतिकृती असणार आहे. तर इतर रिक्षा पुष्पहाराने सजणार आहेत. यानिमित्त पारंपारिक वेशभूषा स्पर्धाही ठेवण्यात आली असून रुचिरा हॉटेल येथे स्पर्धकांनी नावनोंदणी करावयाची आहे. या रॅलीनंतर बंदर जेटी येथे श्रीफळाची विधिवत पूजा करून रिक्षा व्यावसायिकांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करण्यात येणार आहे. या रॅलीचे नियोजन व जबाबदारी रिक्षा व्यवसायिकांकडे सोपविण्यात आली असून यामध्ये पर्यटन व्यावसायिक महासंघ, मातृत्व आधार फाउंडेशन, व्यापारी व व्यावसायिक सहभागी होणार आहेत. या उपक्रमात मालवणातील सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, व्यापारी, पर्यटन व्यावसायिक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी बाबा मोंडकर यांनी केले.
दरवर्षी नारळी पौर्णिमेला हा उपक्रम राबविण्यात येणार असून यावर्षी या उपक्रमाचे प्रतिनिधित्व रिक्षा व्यावसायिकांना देण्यात आले आहे. याच प्रमाणे दरवर्षी मालवणातील विविध व्यापारी वर्ग व व्यावसायिकांच्या घटकांना श्रीफळ अर्पण करण्याचा मान देण्यात येणार आहे, असेही यावेळी बाबा मोंडकर यांनी सांगितले.