भंडारी हायस्कूलच्या १९७१- ७२ च्या माजी विद्यार्थ्यांचं दातृत्व
कांदळगावच्या भूमी आचरेकरला पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत
मालवण | कुणाल मांजरेकर
तालुक्यातील कांदळगांव येथील कु. भूमी आचरेकर या मुलीने प्रतिकूल परिस्थितीत दहावी परीक्षेत ९३.४० टक्के गुण मिळवून यश मिळवले. पुढील शिक्षणासाठी तिची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिच्या शिक्षण प्रवाहात खंड पडण्याची शक्यता होती. याबाबत समाज माध्यमातून माहिती मिळाल्याने भूमी हिच्या पुढील शिक्षणात आपल्या परीने काही योगदान देण्यासाठी भंडारी हायस्कूल मालवणच्या १९७१- ७२ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आज भंडारी हायस्कूलचे माजी शिक्षक गुरूवर्य कै. वसंतराव परुळेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनी तीला २०,०००/- रुपयांची रोख मदत दिली. येथील माघी गणेश मंदिरात कु. भूमी हिच्याकडे ही मदत सुपुर्द करण्यात आली.
यावेळी तिची आई, भाऊ आणि भंडारी हायस्कूल १९७१/७२ बॅचचे माजी विद्यार्थी विष्णू कोरगांवकर, अरूण भोगले उपस्थित होते. या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.