वायरी लुडबेवाडीतही गटार खोदाईचा प्रश्न ऐरणीवर ; अनेक घरांना पाण्याचा धोका
माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी केली तात्पुरती उपाययोजना ; नगरपालिकेच्या कारभारावर नाराजी
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली कथित गटार खोदाई सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. शहरातील वायरी लुडबेवाडीत गटार खोदाई न झाल्याने अनेक घरांना पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी स्वतः पुढाकार घेत येथील पाण्याला मोकळी वाट करून दिली. यावेळी नगरपालिकेच्या कारभारावर श्री. लुडबे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
शहराच्या सीमेवरील वायरी लुडबेवाडा येथे नगरपालिकेच्या वतीने गटार खोदाई करण्यात आलेली नाही. येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी येथील आप्पा चव्हाण दुकान ते शंकर गोसावी घर या परिसरात व्हाळी कम रस्ता मंजूर करण्यात आला होता. या कामाला तांत्रिक मंजुरीही देण्यात आली आहे. मात्र अद्याप या कामाला निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. शहरात विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणल्याचा वलग्ना तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केल्या. मात्र हे काम जाणीवपूर्वक का डावलण्यात आले ? असा सवाल माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी केला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने येथील अनेक घरात पाणी जाण्याचा धोका निर्माण झाला असून मातीची घरे पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी आप्पा लुडबे यांनी या परिसरातील मोरीची साफसफाई करून पावसाच्या पाण्याला मोकळी वाट करून दिली.