सिंधुदुर्गात २०० कोटींचं प्रशिक्षण केंद्र उभारणार – नारायण राणेंची घोषणा
प्रत्येकाने उद्योजक, मालक बनणारच, असा आजच निर्धार करण्याचं आवाहन
वैभववाडी येथे जन आशीर्वाद यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत ; ढोल ताशांचा गजर
वैभववाडी (प्रतिनिधी) केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात दाखल झालीय. वैभववाडी इथं या यात्रे दरम्यान जिल्ह्यात २०० कोटी रुपये खर्चून उद्योग- व्यवसायाचं प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा ना. राणेंनी केलीय. तरुणांना, उद्योजकांना व्यवसायिकांना कर्ज देण्याचे काम माझा विभाग करणार आहे. कोकणात उद्योग उभे करणे, रोजगार सुधारणे ही माझी जबाबदारी आहे. त्यासाठी हे केंद्र उभारलं जाईल. याठिकाणी सर्व प्रकारची यंत्रसामुग्री असेल. प्रत्येकाने आजच निर्धार करा, मी उद्योजक, मालक बनणारच असं आवाहन नारायण राणे यांनी वैभववाडी येथे जन आशिर्वाद यात्रे प्रसंगी बोलताना केलंय.
नामदार नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा वैभववाडीत दाखल होताच त्यांचे नागरिकांनी जंगी स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर आमदार कालिदास कोळंबकर, आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार शाम सावंत, भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी व मधु चव्हाण व मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नारायण राणे म्हणाले २०० कोटी खर्चून जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी ट्रेनिंग सेंटर उभे राहत आहे. लघु व मध्यम उद्योगांना कर्ज देण्याचे काम माझा विभाग करणार आहे. यापुढे तरुण मुंबईकडे नोकरीसाठी जाणार नाहीत. जिल्ह्यातच उद्योजक व मालक बनतील व दुसऱ्याला नोकऱ्या देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी तरुणांनी तसेच महिला बचत गटांनी मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे. असे सांगितले.
केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. शिवकालीन मर्दानी खेळ, फुगडी व ढोलपथक वाद्य या यात्रेत सर्वांचे आकर्षण ठरले. वैभववाडीत राणे साहेब यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भाजपच्या वतीने तसेच विविध संघटना, समाज यांच्या वतीने नारायण राणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. राजेंद्र पाताडे यांनी मानले.
खारेपाटण, तरेळे येथून ही यात्रा वैभववाडीत दाखल झाली. व फोंडा मार्गे कणकवलीकडे रवाना झाली.