रमेश मोरे, जया जाधवची हत्या कशी झाली ? स्वतःच्या वहीनीवर ऍसिड फेकायला कोणी लावलं ?
टप्प्याटप्याने सगळं बाहेर काढणार ; नारायण राणेंनी भरला ठाकरे सरकारला दम
रत्नागिरी: केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची दुसऱ्या टप्प्यातील जन आशीर्वाद यात्रा शुक्रवार पासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यावेळी पुन्हा एकदा राणेंनी शिवसेनेवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. रमेश मोरे, जया जाधवची हत्या कशी झाली ? भावाच्या पत्नीवर ऍसिड फेकायला कुणी सांगितलं ? असा सवाल करून मी ३९ वर्ष तुमच्याच सोबत होतो, मलाही जुनी प्रकरणं माहीत आहेत. ही सगळी सर्व जुनीप्रकरणं टप्याटप्याने बाहेर काढणार, खणखणीत आवाज केलात तर खणखणीत वाजवणार, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.
रत्नागिरीत भाजप कार्यकर्त्यांशी बोलताना नारायण राणे यांनी हा इशारा दिला. आता जुन्या गोष्टी काढणार आहेत. काढा ना. दोन वर्षे झाली. शोधत आहेत, काढत आहोत, काढाना. आम्हालाही जुन्या गोष्टी माहीत आहे. रमेश मोरेची हत्या कशी झाली? त्याचं कारण काय आहे. जया जाधवची हत्या कशी झाली? त्याचं कारण काय आहे. माहीत आहे. आपल्याच बंधुच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कोणी सांगितलं? कोणाला सांगितलं? आणि संस्कार. असे संस्कार. आपल्याच भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकण्याचे… मी टप्याटप्याने सर्व काढणार. सुशांतची केस संपली नाही. दिशा सालियनचीही संपली नाही. मी केंद्रात मंत्री आहे. जरा आठवण करा. रिस्ट्रिक्शन देऊन काय करणार. अटक? किती दिवस. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा राणेंनी दिला आहे.
दरोडेखारासारखी केंद्रीय मंत्र्याला अटक ?
दरोडेखोराला अटक करतात तसं केंद्रीय मंत्र्याला अटक करण्यात आली. त्यासाठी दोन अडीचशे पोलीस आणले. काय पराक्रम आहे. उगाच दादागिरी करू नका. तो तुमचा पिंड नाही. तुम्हाला अनुभव नाही ? तुम्ही पाहिलं आम्हाला. जवळून अनुभवलं आहे. नको त्या वाटेत जाऊ नका. आज ना उद्या पूर्वी सारखा माझा आवाज खणखणीत होईल. आवाज खणखणीत झाल्यावर खणखणीत वाजवणार, असा इशाराही त्यांनी दिला.