देशांतर्गत प्रवासाला निघताय ? मग हे वाचाच… केंद्र सरकारची नवीन नियमावली !
नवी दिल्ली : भारतात कोरोना संसर्गाची स्थिती सौम्य व मध्यम स्वरुपात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा काही नियम नव्याने लागू करण्यात येत आहेत.
देशातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आता देशांतर्गत प्रवासासाठी कोविड चाचणी बंधनकारक नसेल, मात्र एखाद्या राज्याने कोविड चाचणी अनिवार्य असल्याचा नियम कायम ठेवला, तर त्या राज्याला तशी सूचना प्रसिद्ध करावी लागणार आहे. देशांतर्गत हवाई, रस्ते व रेल्वे प्रवास करण्यास कोणतीही अडचण नाही. लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या नागरिकांकडे ‘आरटीपीसीआर’ चाचणीची मागणी करु नये, अशा सूचना केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने विविध राज्यांना दिल्या आहेत. कोरोना लसीचा दुसरा डोस घेऊन 15 दिवसांचा काळ झाला असल्यास, अशा प्रवाशांकडे ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा रिपोर्ट मागू नये. मात्र, राज्यात प्रवेश करण्याच्या वेळी एखाद्यास तापाची लक्षणे आढळून आल्यास, त्या व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी केली जाण्याची शक्यता आहे.