राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेवर सतीश सावंतांची बोचरी टीका !

कुणाल मांजरेकर 


केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा शनिवारी सिंधुदुर्गात दाखल होत आहे. या यात्रेवर शिवसेना नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी बोचरी टीका केली आहे.  दिल्लीवरून मुंबईत आल्यानंतर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर नतमस्तक झाले, पण तो त्यांचा ढोंगीपणा होता. अवघ्या दोन दिवसातच हा ढोंगीपणा उघड झाला. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांच्या कानाखाली मारण्याची भाषा त्यांनी केली. त्यातून त्यांचा ढोंगीपणा उघड होतानाच मुख्यमंत्र्यांविषयी अशी भाषा वापरत त्यांनी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेचा अवमान केला आहे. त्यामुळे भाजपची ही जनआशीर्वाद यात्रा राहिलेली नसून तिचे स्वरूप बदलून आता ती जन अवमान यात्रा झाली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


        केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी केलेल्या वक्तव्याचा सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी समाचार घेतला. एखाद्या केंद्रीय मंत्र्याने मुख्यमंत्र्यांविषयी असे वक्तव्य करणे हे महाराष्ट्रातील जनतेचे दुर्दैव्य आहे. ही यात्रा सिंधुदुर्गात येण्यापूर्वीच कणकवली तालुक्यातील कलमठ, माईण, हळवल आदी गावातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. कलमठ गावामध्ये शिवसेनेची सदस्य संख्या कमी असतानाही राजू राठोड, रामदास विखाळे आदींसह शिवसेना पदाधिकार्‍यांनी केलेल्या प्रयत्नातून त्या ग्रामपंचायतीवर भगवा फडकला आहे. कणकवली मतदारसंघातील भाजपचे आ. नितेश राणे यांची दुसर्‍यावर टीका करणे, अवमान करणे हीच कामे सुरू आहेत. गावागावातील विकासकामे होत नसल्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपली विकासकामे होतील या विश्वासातून अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे सतीश सावंत यांनी सांगितले.


नारायण राणे हे मुंबईत आल्यानंतर स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर नतमस्तक होणे हा त्यांचा केवळ दिखावूपणा होता. म्हणूनच स्व. बाळासाहेबांनी त्यांनी माफ केले नाही, त्याचे परिणाम नारायण राणे यांना अवघ्या दोन दिवसात भोगावे लागले. जी यात्रा कोकणात जनआशीर्वाद घेण्यासाठी येत होती त्याच यात्रेला महाडच्या दिशेने जावे लागले. आज नारायण राणे यांना भाजप माझ्यासोबत आहे, असे सांगावे लागत आहे. ज्यावेळी एखाद्या पक्षाचे लोक सोबत नसतात तेव्हाच त्यांना असे सांगावे लागत असते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नसल्याचे सांगितले आहे. नारायण राणे किंवा नितेश राणे हे दुसर्‍यावर टीका करून आपली उंची वाढविण्याचा प्रयत्न करत असतात. यापूर्वी त्यांच्याच पक्षाचे माजी केंद्रीयमंत्री असलेल्या सुरेश प्रभू यांची अशीच अवहेलना ते करत होते. सुरेश प्रभू यांना दिल्लीत विचारतो कोण? सुरेश प्रभू हे सिंधुदुर्गात येताना खराब कपडे घालतात, मात्र दिल्लीत ते सुटाबुटात असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका सुटाची किंमत 15 कोटी आहे अशी टीका करून आता त्यांच्या सोबतच काम करणे ही त्यांची संस्कृती आहे. दुसर्‍यावर टीका करून आपली उंची वाढवायची, मात्र यावेळी त्यांची उंची निश्चितच कमी झाली आहे.

जनआशीर्वाद यात्रेतून शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करणे या पलिकडे कोणताही संदेश नारायण राणेंनी दिला नाही. उलट या यात्रेतील वक्तव्यांमुळेच शिवसैनिक पेटून उठला आहे. जशास तसे उत्तर देण्यासाठी शिवसैनिक तयार आहे. त्यामुळे निश्चितच सिंधुदुर्गसह महाराष्ट्रात शिवसेनेची घोडदौड सुरू राहील यादृष्टीने आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक कार्यरत राहणार आहोत असे सतीश सावंत यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!