पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या ऐकण्यासाठी दिल्लीचे नेते गल्लीत !

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मालवणात जाणून घेतल्या समस्या

रस्ते, वीजेसह पर्यटनाच्या मूलभूत समस्यांचा व्यावसायिकांकडून उहापोह

मुंबईत लवकरच बैठक घेऊन तोडगा काढणार : ना. श्रीपाद नाईक यांची ग्वाही

कुणाल मांजरेकर

मालवण : केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सोमवारी मालवण मध्ये पर्यटन व्यावसायिकांची बैठक घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी अरुंद रस्ते, वीजेची समस्या, किनाऱ्यावरून बंधारा कम रस्त्याची आवश्यकता यांसह पर्यटन वाढीसाठी भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा उहापोह यावेळी व्यावसायिकांकडून करण्यात आला. दरम्यान, ज्या उद्देशाने आपण ही बैठक घेतली, तो उद्देश आज सफल झाला आहे. पर्यटन व्यवसायाला भेडसावणाऱ्या समस्या या बैठकीतून समोर आल्या असून मुंबईत लवकरच केंद्र आणि राज्य पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या समस्यांवर तोडगा काढून व्यावसायिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही ना. श्रीपाद नाईक यांनी दिली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर कोकण रिजन आणि पर्यटन समिती- मासिया आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील हॉटेल चिवला येथे सोमवारी सायंकाळी पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटन महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर, चंद्रशेखर पुनाळेकर, अशोक सावंत, युवराज लखमराजे भोसले, महेश मांजरेकर, नकुल पार्सेकर, सहदेव साळगावकर, धोंडी चिंदरकर, उमेश गाळवणकर, संध्या तेरसे, अवि सामंत, मंगेश जावकर, चारुशीला आचरेकर, मेघा गावकर यांच्यासह तालुक्यातील पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चासत्रात जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांनी विविध समस्या मांडल्या. पर्यटन जिल्हा होऊन तीन तप उलटले मात्र अद्यापही पायाभूत सुविधांची वानवा आहे. हंगामात अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असल्याने किनारपट्टीच्या बाजूने बंधाराकम रस्ता व्हावा, दुर्लक्षित पर्यटन स्थळांचा विकास व्हायला हवा. यासाठी त्याठिकाणी जाणारे रस्ते, इंटरनेट सुविधा यासह अन्य सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. जलक्रीडा व्यावसायिकांना परवाने हे जिल्ह्यातच उपलब्ध करून घ्यावेत यासाठी एक खिडकीची सुविधा निर्माण करावी. किनारे, गडकिल्ले स्वच्छ राहिले पाहिजे यासाठी स्थानिकांसह पर्यटन व्यावसायिकांचा सहभाग असायला हवा. गेली बरीच वर्षे येथील पर्यटन व्यावसायिकांनी शासनाची कोणतीही मदत न घेता आपला व्यवसाय उभा केला आहे. मात्र या व्यवसायात व्यावसायिकांना बँकांची कर्जे मिळत नाहीत. त्यामुळे पर्यटनाला सेवा उद्योग म्हणून मान्यता देण्यात यावी. यामुळे पर्यटन व्यावसायिकाला बँका कर्जे देतील. चिपी विमानतळावरून विमानाच्या फेऱ्या वाढवाव्यात. पर्यटन विभागाकडे शुल्क भरून अनेक व्यावसायिकांनी निवास न्याहरी योजना सुरू केल्या. मात्र त्यांना पर्यटन विभागाकडून व्यवसाय मिळाला नाही. किनारपट्टी भागात पर्यटन हंगामात वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने भूमिगत वीज वाहिन्यांचा प्रकल्प राबविण्यात यावा. पावसाळी पर्यटन कसे बहरेल यादृष्टीने ही प्रयत्न करावेत अशा मागण्या व्यावसायिकांनी केल्या.


केंद्राने पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला दत्तक घेतले आहे. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून या भागाचा विकास होण्यासाठी जिल्ह्यासाठी वेगळी पॉलिसी तयार करावी. शासकीय समिती स्थापन करण्यात यावी. अन्य राज्यांचे जसे पर्यटनाचे ब्रँडिंग केले जाते तसे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ब्रँडिंग करण्यात यावे. मोरयाचा धोंडा या ऐतिहासिक ठिकाण धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावे. याठिकाणी आरमार म्युझियम व्हावे. मच्छीमारांचे, दशावतार कलेचे कल्चर सेंटर करावे. होम स्टे पर्यटन संचालनालयाच्या संकेतस्थळावर द्यावीत जेणेकरून येथील पर्यटन व्यावसायिकांना व्यवसाय मिळेल यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत बाबा मोंडकर, महेश सामंत, डी. के. सावंत, संजय खराडे, गुरुनाथ राणे, रवींद्र खानविलकर, महेश जावकर, जितेंद्र पंडित, रामा चोपडेकर, राजन नाईक, अवि सामंत, चंद्रशेखर पुनाळेकर आदींनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन नकुल पार्सेकर यांनी केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!