नूतन गटविकास अधिकाऱ्यांचे शिवसेनेकडून स्वागत ; विकास कामांवर चर्चा
मालवण : मालवण पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांचे शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी तालुक्यातील विविध विकासकामांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक पंकज सादये, नरेश हुले, दत्ता पोईपकर, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण आदी उपस्थित होते. तालुक्यातील विविध विकासकामांसाठी जिल्हा परिषदेबरोबरच जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातून बरीच कामे मार्गी लागली आहेत. ग्रामीण भागातील बऱ्याच रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याची कामे होणे आवश्यक असून यासाठी बांधकाम विभागाने प्रशासनाकडे निधीची मागणी करावी. यासाठी आवश्यक ती मदत, सहकार्य केले जाईल असे श्री. खोबरेकर यांनी स्पष्ट केले. सध्या प्रशासक असल्याने ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही याला सकारात्मकता दर्शविली. पंचायत समितीला उपलब्ध होणाऱ्या फंडातून खड्डे बुजविण्याचे कामे यापूर्वी करण्यात येत होती. सध्या या कामासाठी निधी उपलब्ध नसला तरी तो उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हास्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.