राजकीय पक्षांच्या नाकावर टिच्चून मुंबई- गोवा महामार्गावर उद्यापासून टोलवसुली
दोन ठिकाणी होणार टोलवसुली ; ओसरगाव आणि राजापूर – हातीवलेचा समावेश
सिंधुदुर्गातील वाहनांनाही भरावा लागणार टोल ; आता राजकीय पक्ष कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष
कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोलनाका सुरू करण्यास सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र विरोध दर्शवला असतानाही राजकिय पक्षांच्या नाकावर टिच्चून उद्या १ जूनपासून ओसरगाव टोलनाक्या बरोबरच राजापूर हातीवले मधील टोल नाका कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना या मार्गावरून प्रवास करताना पैसे मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे सिंधुदुर्गातील वाहनांना देखील टोल भरावा लागणार असल्याने आता जिल्ह्यातील राजकीय पक्ष कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
ओसरगाव येथील टोलनाक्याला अनेक राजकीय पक्षांनी विरोध केला होता. महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण झाल्याशिवाय टोल सुरु केला, अन्यथा आंदोलन करु असा इशाराही देण्यात आला होता. मात्र हा विरोध झुगारून ओसरगाव टोलनाका सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी सगळी तयारीदेखील पूर्ण करण्यात आली आहे. या टोल वसुलीचं कंत्राट एमटी करीमुनिसा कंपनीकडे देण्यात आलंय. ओसरगावसोबत राजापूर-हातीवले मधील टोलही उद्यापासून सुरु होणार आहे. हे टोलनाके सुरु होत असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. टोल सुरु केल्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोकांना भुर्दंड बसणार आहे. दरम्यान, टोल नाक्यापासून २० किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या वाहनांना मासिक ३१५ रुपयांचा पास देण्यात येणार आहे. तर इतर वाहनांना मात्र टोल भरावा लागणार आहे. बाईक, स्कूटी आणि रिक्षा यांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षा चालकांना या टोल वसुलीतून दिलासा मिळालाय. दुसरीकडे फास्ट टॅग असलेल्या वाहनांना टोलची पन्नास टक्के रक्कम भरावी लागेल.
असा असेल ओसरगाव मधील टोल वसुलीचा दर
जीप, व्हॅन, कार- सिंगल जर्नी ९० रुपये, रिर्टन जर्नी टोल घेतल्यास १३५ रुपये
हलकी व्यावसायिक वाहनं, मोठी मालवाहू वाहनं आणि मिनीबससाठी १३५ रुपये रिटर्न जर्नीसाठी २२० रुपये
ट्रक आणि बससाठी (डबल अँक्सल) – ३०५ रुपये, रिटर्न जर्नीसाठी ४६० रुपये
ट्रक आणि बस (ट्रिपल ॲक्सल) – ३३५ रुपये, रिटर्न जर्नीसाठी – ५०० रुपये
एमएच ०७ पासिंग वाहनांसाठी ४५ रुपये टोल
एमएच ०७ पासिंग मिनीबससाठी ७५ रुपये एमएच ०७ पासिंग ट्रक-बससाठी ११५ रुपये