देवबाग बंधाऱ्यास त्वरित पर्यावरण मंजुरी द्यावी

भाजप नेते, माजी खा. निलेश राणे यांचे पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांना निवेदन

मालवण : देवबाग ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या खासदार निधीतून १ कोटी रुपयांचा निधी सागरी किनारपट्टीवर बंधारा बांधणी कामासाठी मंजूर केला. तरी देवबाग गावची धोकादायक स्थिती लक्षात घेता या कामास पर्यावरण मंजुरी द्यावी, अशा आशयाचे निवेदन भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांना दिले आहे.

देवबाग हा गाव समुद्र आणि बॅकवॉटर यांच्या मधोमध स्थित असल्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात या गावात भीतीचे वातावरण असते. इकडचे गावकरी आपला जीव मुठीत घेऊन जगत असतात. पावसामध्ये अतिशय दयनीय व भयावह परिस्थिती या गावाची असते. ह्या किनारपट्टीवर १९९० साली बंधारा बांधण्यात आला होता. तो कालानुरूप जीर्ण झाल्यामुळे त्याची आज ३२ वर्षानंतर परिस्थिती संरक्षणाच्या दृष्टीने खात्रीलायक राहिलेली नाही. सदर धोक्याचा अंदाज घेऊन, देवबाग गावातील गावकऱ्यांच्या संरक्षणासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या खासदार निधीतून १ कोटी रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर केला आहे. ज्याची प्रशासकीय मान्यता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी त्वरित दिली आहे. आपल्या कार्यालयातून दिल्या जाणाऱ्या पर्यावरण मंजुरी करीता सदरचे काम रखडलेले आहे. 

कोकणात पडणारा पाऊस हा सरासरी ४००० मिलीमीटरच्या जवळपास किंवा त्याहीपेक्षा जास्त असतो. गावची परिस्थिती, गावकऱ्यांच्या जीवाला असणारा धोका व इतर बाबी लक्षात घेता जर तेथे संरक्षण बंधारा नसेल तर गावाची प्रचंड जीवित व वित्तहानी होऊ शकते. ही भीती लक्षात घेऊन आणि माणुसकीचा विचार करून आपण त्वरित पर्यावरण मंजुरी द्यावी. जेणेकरून सदरचे रखडलेले काम त्वरित सुरु होईल आणि शेकडो जीव वाचवता येतील. आपण या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन या कामाला त्वरित मान्यता द्याल व योग्य कारवाई कराल ही अपेक्षा आहे, असे निलेश राणे यांनी या निवेदनात म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!