तारकर्ली दुर्घटनेची प्रशासनाकडून गंभीर दखल ; अनधिकृत बोटींवर आजपासूनच कारवाई
अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाडे : दुर्घटनाग्रस्त बोटीत प्रवाशांकडे लाईफ जॅकेट नव्हते
बोटीत तब्बल २८ ते ३० जणांचा समावेश असल्याचीही दिली माहिती
कुणाल मांजरेकर
मालवण : तारकर्ली बोट दुर्घटनेची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. दुर्घटनाग्रस्त बोटीत तब्बल २८ ते ३० पर्यटक होते. तसेच एकाही पर्यटकाला लाईफ जॅकेट देण्यात आले नव्हते, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. पर्यटन व्यवसायातील अनधिकृत बोटींवर आणि लाईफ जॅकेट न वापरणाऱ्यांवर आजपासूनच कारवाई हाती घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
तारकर्ली एमटीडीसी समोरील समुद्रात पर्यटकांना घेऊन येणारी स्कुबा डायव्हिंगची बोट उलटल्याची दुर्घटना मंगळवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी होडीतील २८ ते ३० जण समुद्रात फेकले गेले. यातील दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर जखमींना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी रुग्णालयात नागरिकांसह राजकिय पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मदत कार्यासाठी गर्दी केली होती. अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घटनास्थळी भेट घेऊन आढावा घेतला.