तळाशील मधील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ ; आ. वैभव नाईक यांचे ग्रामस्थांनी मानले आभार

४ कोटी ५७ लाख रुपये खर्चून ८१० मीटर लांबीचा होणार बंधारा ; ६ महिन्यांच्या आत काम होणार पूर्ण

उर्वरीत ६०० मीटरचा बंधारा देखील वर्षभरात मार्गी लावणार : आ. वैभव नाईकांची ग्वाही

मालवण : तळाशील येथे समुद्रकिनारी धुपप्रतिबंधक बंधारा नसल्याने अतिवृष्टी व समुद्री उधाणाच्यावेळी येथील ग्रामस्थांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. ऑगस्ट महिन्यात येथील ग्रामस्थांनी उपोषण छेडले होते. त्यावेळी उपोषण स्थळी आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन तळाशील वासीयांना धुप्रतिबंधक बंधारा बांधण्याचा शब्द दिला होता. आ. वैभव नाईक यांनी दिलेला शब्द पाळला असून तळाशील गावात तीन ठिकाणी धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी ४ कोटी ५७ लाख रुपये मंजूर करून घेतले आहेत. बंधाऱ्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. आ. वैभव नाईक यांच्या हस्ते गुरुवारी बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ झाला. पहिल्यांदाच तळाशील मध्ये एकाच वेळी ८५० मीटरचा बंधारा बांधण्यात येत असून आ. वैभव नाईक यांनी दिलेला शब्द पाळल्याने तळाशील वासीयांकडून त्यांचे आभार मानण्यात आले. सहा महिन्यांत हे काम पूर्ण होणार असून ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावातील उर्वरित ६०० मीटरच्या बंधाऱ्याचे कामही वर्षभरात पूर्ण केले जाणार आहे, अशी ग्वाही आ. नाईक यांनी दिली.

यामध्ये तळाशील समुद्रकिनारी धुपप्रतिबंधक बंधारा बांधणे निधी १ कोटी २७ लाख ६७ हजार रु., तळाशील समुद्रकिनारी सावळाराम धाकू चोडणेकर यांचे घर ते राजन चंद्रकांत कोचरेकर यांच्या घरापर्यंत धुपप्रतिबंधक बंधारा बांधणे निधी २ कोटी २० लाख ७ हजार रु. व तळाशील समुद्रकिनारी राजन चंद्रकांत कोचरेकर यांच्या घरासमोर धुपप्रतिबंधक बंधारा बांधणे निधी १ कोटी ९ लाख २७ हजार रु. या तीन बंधाऱ्यांची कामे मंजूर झाली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. हे बंधारे मंजूर झाले होते. मात्र सीआरझेड व इतर परवानग्या मिळत नव्हत्या. मात्र आमदार वैभव नाईक यांनी प्रशासकीय स्तरावर व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे आता परवानग्या मिळाल्याने बंधाऱ्याची कामे गतीने सुरू करण्यात आली आहेत. उर्वरित बांधऱ्यांसाठी सीआरझेड परवानगीचे प्रस्ताव सादर केले आहेत. येत्या वर्षभरात सर्व ठिकाणी बंधारा बांधण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती आ.वैभव नाईक यांनी दिली.

ऑगस्ट महिन्यात ग्रामस्थांनी उपोषण केले तेव्हा आ. वैभव नाईक यांच्यावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यांनी त्याचा राग मनात न ठेवता लोकांची नाराजी दूर करण्यासाठी धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याचे वचन दिले. आज त्यांच्यामुळे धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम होत आहे त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो, असे ज्येष्ठ मच्छिमार नेते जयहरी कोचरेकर म्हणाले. तर दिलेला शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असते. आ. वैभव नाईक यांनी देखील बंधारा बांधण्याचा दिलेला शब्द पाळला आहे. ग्रामस्थांच्या नाराजीची दखल घेऊन त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. त्यामुळे बंधारा होत आहे याचा आम्हाला आनंद आहे, असे संजय केळुसकर यांनी सांगत आ. नाईक यांचे आभार मानले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, पतनचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत आचरेकर, सहाय्यक पतन अभियंता पी. बी. पवार, सहाय्यक अभियंता समाधान जाधव, कनिष्ठ अभियंता प्रमोद मोडक, ठेकेदार प्रतिनिधी गौरव मोडक, तळाशील सरपंच आबा कांदळकर, संजय केळुसकर, जयहरी कोचरेकर, ललित देऊलकर, नंदकुमार कोचरेकर, विजय रेवंडकर, गोपाळ मालंडकर, विवेक रेवंडकर, भाऊ मायबा, जयेश केळुसकर, भिकाजी रेवंडकर, प्रकाश बापर्डेकर, संतोष कांदळगावकर, तात्या टिकम, बबन तारी, रामा तांडेल, महेश मालंडकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!