देवबाग बंधाऱ्यासाठी ४ कोटींचा निधी : आ. वैभव नाईकांचा पाठपुरावा
उद्या दुपारी १ वाजता होणार भूमिपूजन ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती
कुणाल मांजरेकर
मालवण : देवबाग गावचे सागरी अतिक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याने राज्य शासनाच्या माध्यमातून ४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. देवबाग संगमापासून उत्तरेकडे ५१० मीटर लांबीचा याठिकाणी बंधारा होणार असून या बंधाऱ्याचे भूमिपूजन उद्या शुक्रवारी २० मे रोजी दुपारी १ वाजता आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली आहे.
देवबाग गावच्या किनारपट्टीची सागरी अतिक्रमणामुळे धूप होत असून याठिकाणी बंधारा बांधण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यामुळे देवबाग बंधाऱ्यासाठी ४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा निधी पतन विभागाकडे वर्ग करण्यात आला असून सर्व प्रकारच्या मान्यतेनंतर या बंधाऱ्याचे शुक्रवारी २० मे रोजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याचे काम पूर्ण करून सागरी अतिक्रमणग्रस्त देवबाग वासीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे हरी खोबरेकर यांनी म्हटले आहे.