दांडी महोत्सवाच्या नावाखाली शिवसेनेकडून “लूट” ; गरीब स्टॉलधारकांनाही सोडलं नाही
सुदेश आचरेकर यांचा आरोप ; शासन, बँका, व्यापारी, सुवर्णकारांकडून मोठ्या प्रमाणात निधी जमवला
शिवसेनेवर आरोप करताना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे मात्र आचरेकरांनी मानले आभार
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण दांडी किनारी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवा वरून भाजप नेते, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. दांडी महोत्सव हायजॅक करून हा महोत्सव शिवसेना पुरस्कृत असल्यासारखा शिवसेनेची मंडळी वावरत होती. उद्घाटन सोहळ्यात आमदार वैभव नाईक यांनी या महोत्सवासाठी पालिकेचा एकही रुपया घेतला नाही असे जाहीर केले. मग पालिकेने दहा लाख रुपयांची निविदा प्रक्रिया का केली ? शहरातील बँका, बिल्डर, व्यापारी, सुवर्णकार यांच्याकडून महोत्सवासाठी निधी संकलन कशासाठी केला ? रॉक गार्डन परिसरातील छोट्या छोट्या स्टॉलधारकांनाही सोडले नाही. त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपयांची पिग्मी जमवण्यात आली. हा निधी कोणाच्या घशात गेला ? असा सवाल श्री. आचरेकर यांनी करून आमदारांनी या सगळ्या खर्चात त्यांचे पैसे कुठे लागले याचे उत्तर जनतेला द्यावे, असे आव्हान सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिले.
येथील भाजप कार्यालयात गुरुवारी सकाळी ही पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, शहर मंडल प्रभारी अध्यक्ष विजय केनवडेकर, भाऊ सामंत, मोहन वराडकर, प्रमोद करलकर आदी उपस्थित होते. श्री. आचरेकर म्हणाले, महोत्सवाच्या नावाखाली लाखो रुपयांची माया जवळ करण्यात आली ती कोणासाठी? कोणाच्या घशात गेली? याचे आत्मपरीक्षण आमदारांनी करणे गरजेचे बनले आहे. शिवसेनेत सध्या कुंपणच शेत खातय अशी अवस्था आहे. त्यामुळे आता तरी या लांडग्यांपासून सावध राहावे असा टोला त्यांनी लगावला. महोत्सव शिवसेनेचा म्हणत असाल तर मग या महोत्सवाला पालकमंत्री, खासदार हे अनुपस्थित का राहिले ? यावरून आमदारांचे अपयश दिसून येते. गेल्या दहा वर्षात आमदारांना साधा सांस्कृतिक कार्यक्रम घेता आला नाही आणि आता जनतेच्या पैशातून महोत्सवाची भाषा करतात खरंच हे हास्यास्पद आहे असे आचरेकर म्हणाले.
दांडी ग्रामस्थांसह तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे आभार
पालिका प्रशासनाने दांडी येथे महोत्सवाचे आयोजन केले. त्याबद्दल मुख्याधिकारी आणि प्रशासन यांचेही आभार मानतो. दांडी भागाला महोत्सवात प्रतिनिधित्व दिले गेले. या पर्यटन महोत्सवात या विभागातील सर्व पर्यटन व्यावसायिक, स्थानिक मच्छीमार, युवावर्गाने चांगले सहकार्य करत हा महोत्सव पार पडला. जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी दांडी येथे हा महोत्सव घेण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आणि हा महोत्सव यशस्वी करून दाखविला त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानत आहे असे श्री. आचरेकर म्हणाले.
पालिका निवडणुका पुढे ढकलून स्थानिक प्रशासनावर दबाव आणून सत्ताधारी मंडळींकडून स्वतःच्या फायद्यासाठी लोणी काढण्याचे काम केले जात आहे. प्रशासक बसवण्याची मुदत संपूनही निवडणुका घेण्यास ओबीसी आरक्षणाचे कारण पुढे करून चालढकल केली जात आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल राज्य शासन करत आहे. महाविकास आघाडीचे मोठे षड्यंत्र हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना झुलवत ठेवण्याचे आहे असा आरोप आचरेकर यांनी केला. मध्यप्रदेश सरकारला मान्यता मिळते. मात्र राज्य शासनाकडून चुकीच्या पद्धतीने कार्यवाही केली जात असून ओबीसींना आरक्षण द्यायचेच नाही असे दिसत असल्याची टीकाही आचरेकर यांनी यावेळी केली.
स्टॉलधारकांची फसवणूक
या महोत्सवासाठी पालिकेच्या वतीने २० स्टॉल उभारण्यात आले होते. मात्र यातील केवळ ४ स्टॉलला प्रतिसाद मिळाला. या स्टॉलना देखील प्रतिसाद मिळाला नाही. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या स्टॉलसाठीचे १ हजार रुपये स्वतः देण्याचे जाहीर केले होते. असे असताना त्यांच्याकडून २-२ हजार रुपये बळजबरीने वसूल करण्यात आले. त्यामुळे तुमच्या अनुपस्थितीत तुमचे नेते कोणते दिवे लावतात, याकडे आमदारांनी लक्ष द्यावे, असे सुदेश आचरेकर म्हणाले.
शहर स्वच्छता, गटार- व्हाळ्या साफसफाईकडे दुर्लक्ष
जनतेच्या पैशावर स्वतःचे जीव खेळवण्याचे प्रकार सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहेत. आमदार, खासदार आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस गटारे, व्हाळ्या यांची साफसफाई केली जाते. मात्र आता मे महिना संपत आला तरी अद्यापही साफसफाई सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे उद्या पावसाळ्यात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरादारात- दुकानात जाऊन त्यांचे नुकसान झाल्यास त्याला सत्ताधारी आमदार, खासदार आणि मंत्री महोदय जबाबदार राहतील, असा इशारा सुदेश आचरेकर यांनी दिला आहे.