सिंधु कृषी, पशु-पक्षी प्रदर्शन आणि पर्यटन मेळाव्याचा दिमाखात शुभारंभ
कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल- खा. विनायक राऊत
शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन उत्पन्न वाढवावे- आ. दीपक केसरकर
कृषी प्रदर्शनातून जिल्ह्यातील कृषीक्षेत्राला चालना मिळेल : आ. वैभव नाईक
कुडाळ : सिंधु कृषी औद्योगिक, पशु-पक्षी प्रदर्शन आणि पर्यटन मेळाव्याचा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते व माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिपप्रज्वलन करून दिमाखात शुभारंभ करण्यात आला. कुडाळ एसटी स्टँडच्या बाजूच्या मैदानावर हा कृषी प्रदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला असून २० मे पर्यत असणार आहे. यावेळी खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रदर्शनातील स्टॉलला भेट देऊन पाहणी केली व शुभेच्छा दिल्या.
यावेळी खा. विनायक राऊत म्हणाले, कृषी प्रदर्शनाचे भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आले असून हे कृषी प्रदर्शन शंभर टक्के यशस्वी होणार आहे. येथे असलेल्या सर्व कृषी स्टॉल्समध्ये आधुनिक शेतीची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून विविध प्रकारची अत्याधुनिक यंत्र सामग्री उपलब्ध करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर पूर्वीची चांदा ते बांदा योजना हि आता सिंधू-रत्न योजना म्हणून नावारूपास आली आहे. चांदा ते बांदा योजनतून जिल्ह्याची प्रगती झाली. आता सिंधू-रत्न योजनेच्या माध्यमातून देखील सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकेल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चिपी एअरपोर्ट जिल्ह्यासाठी फायदेशीर ठरत आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पर्यटन योजना राबविण्यास आम्ही कटिबध्द आहोत. संपूर्ण कोकण समृद्ध व्हावं, हाच आमचा उद्देश आहे, असे ते म्हणाले.
याप्रसंगी आ. दीपक केसरकर म्हणाले, कृषी प्रदर्शन हे शेतकरी हिताचे आहे. आजच्या शोभायात्रेचे देखील उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासास गती मिळाली आहे. सर्वांनी योग्य पद्धतीने काम केल्यास पुढील दोन वर्षात जिल्ह्याचा कायापालट होईल. शेतकऱ्यांनी देखील शासकीय योजनांचा लाभ घेऊन आधुनिक शेतीतून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत. कृषी पर्यटन आणि ग्रामीण पर्यटनाची जागृती होणे महत्त्वाचे असून पुढील तीन वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ हि संकल्पना देखील फायदेशीर ठरणार आहे असे त्यांनी सांगितले.
आमदार वैभव नाईक म्हणाले, चांदा ते बांदा योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, भातखरेदी, हळद लागवड यांच्या माध्यमातून जिल्ह्यात शेती क्षेत्रात उत्क्रांती झाली आहे. येत्या तीन दिवसात या कृषी प्रदर्शनातून देखील शेतकरी शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवू शकतात.या प्रदर्शनातून जिल्ह्याच्या कृषीक्षेत्राला चालना मिळेल. अनेक शेतकरी शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहेत. जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी. जिल्ह्यात १७०० पेक्षा अधिक पावर ट्रीलरचे शासनामार्फत देण्यात आले आहे. भात लावणी, कापणी मशीन, तसेच इतर अवजारे शेतकऱ्यांना शासकीय योजनेच्या माध्यमातून देण्यात आली. तसेच स्थापित १३ शेतकरी बँकांद्वारे शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारचे पाठबळ असून त्याचा त्यांनी लाभ घ्यावा.असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी म्हणाल्या, कृषी प्रदर्शनात मास्क विरहित चेहरे बघून बरे वाटले. कोरोना गेल्यामुळे या कृषी मेळाव्यातून आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. मी जिल्हा परिषद मध्ये काम केले आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना मला माझे माहेर म्हणजे जिल्हा परिषदेत आल्यासारखे वाटत आहे.असे सांगत कृषी प्रदर्शनाच्या नियोजनाबाबत त्यांनी गौरवोद्गार काढत शुभेच्छा दिल्या.
या महोत्सवाचे उदघाटन पार पडल्यानंतर प्रास्ताविकपर भाषण करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सिंधू कृषी औद्योगिक, पशु-प्रदर्शन आणि पर्यटन मेळाव्याची थोडक्यात माहिती दिली. याप्रसंगी कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना नेते सतीश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जि. प. सदस्य नागेंद्र परब, हरी खोबरेकर, तहसीलदार अमोल पाठक, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विद्यानंद देसाई, कृषी अधिकारी श्री. म्हेत्रे, जिल्हा कृषी विकास अधिकारी सुधीर चव्हाण, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, कुडाळ तालुका आरोग्य अधिकारी संदेश कांबळे, एमआरजीएस गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, रुची राऊत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, कुडाळच्या नगराध्यक्षा आफरीन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट,अतुल बंगे, जयभारत पालव, वर्षा कुडाळकर, अनुप्रीती खोचरे, श्रेया परब, स्नेहा दळवी, मथुरा राऊळ, श्रेया गवंडे, श्रुती वर्दम, सई काळप, अनुष्का गावकर, संजय भोगटे, सुशील चिंदरकर, योगेश धुरी, रुपेश पावसकर, सचिन काळप, उदय मांजरेकर, गुरु गडकर, संदीप म्हाडेश्वर, नितीन सावंत, राजू गवंडे, सचिन कदम, बाळा कोरगावकर आदींसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद, पंचायत समिती व जिल्हा प्रशासनातील विविध खात्यांचे अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक सरपंच, उद्योजक, शेतकरी व कुडाळ चे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.