मुंबईची ऋतुजा राणे ‘मालवण सुंदरी’ ची मानकरी

रेडीची पूजा राणे उपविजेती तर मालवणची तन्वी वेंगुर्लेकर तृतीय

मालवण : मालवण नगरपरिषद आणि जिल्हा नियोजन समितीच्या वतीने दांडी बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या मालवण पर्यटन महोत्सवात घेण्यात आलेल्या “मालवण सुंदरी” स्पर्धेत मुंबईच्या ऋतुजा राणे हिने अंतिम विजेता होण्याचा बहुमान मिळवला. सिंधुदुर्गसह मुंबई, पुणे, रत्नागिरी अश्या विविध ठिकाणाहून आलेल्या १७ स्पर्धकातून ऋतुजा राणे “मालवण सुंदरी” ची विजेती ठरली. तर रेडी येथील पूजा राणे उपविजेती ठरली. तर मालवण वायरी येथील तन्वी वेंगुर्लेकर हिने तृतीय क्रमांक मिळवला.

या स्पर्धेत बेस्ट कॅटवॉक : पूजा महादळकर, बेस्ट स्माईल : मैथिली राणे, बेस्ट हेअर : नंदिनी बिले, बेस्ट फोटोजेनिक : जानव्ही श्रीनाथ, बेस्ट पर्सनॅलिटी : समिधा कुबल, यासह सर्वोत्कृष्ट वेशभूषा किताबाने पूजा राणे यांना सन्मानित करण्यात आले.

मालवण नगरपरिषद आणि जिल्हा नियोजन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते १५ मे या कालावधीत दांडी समुद्रकिनारी सुरू असलेल्या मालवण पर्यटन महोत्सवानिमित्त शनिवारी रात्री मालवण सुंदरी सोहळा रंगला. आमदार वैभव नाईक यांचीही उपस्थिती सोहळ्यादरम्यान होती. स्पर्धेचे परीक्षण डॉ. सायली प्रभू व प्रणय तेली यांनी केले.

स्पर्धेतील विजेत्यांना नगरपालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे, सौ. जिरगे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सौ. स्मृती कांदळगावकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, यतीन खोत, माजी आरोग्य सभापती पंकज सादये यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

कोवळ्या मुलांच्या आत्महत्या वेदना देतात ओ ; ऋषी देसाई भावूक

मालवणचे सुपुत्र आणि प्रख्यात वृत्त निवेदक ऋषी देसाई यांच्या निवेदनाने या स्पर्धेला अधिकच रंगत आली. स्पर्धकांना चिमटे काढण्या बरोबरच त्यांनी मांडलेले सामाजिक प्रबोधनात्मक मुद्देही उपस्थितांना स्तब्ध करणारे ठरले. १४ लक्ष योनीतून प्रवास केल्यानंतर मनुष्य जन्म मिळतो, असे असताना आज-काल कोवळ्या वयाची मुलं आत्महत्या का करत आहेत ? असा सवाल करून या किनारपट्टी भागात वर्षभरात १८ ते २० युवकांच्या आत्महत्या झाल्या. हे ऐकताना आमचं मन विषण्ण होतं, मग त्या आईबापाचं काय होत असेल ? आज त्यांचा मुलगा असता तर आजच्या महोत्सवात कुठेतरी मौजमजा करत बसला असता. मनुष्य सोपा नाही, त्यामुळे आत्महत्या करू नका, असं कळकळीचं आवाहन ऋषी देसाई यांनी केलं. उपस्थितांनी ही या आवाहनाला टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.

रिक्षांचा १६ तासांचा प्रवास अन विजेतेपद

मालवण सुंदरी’ स्पर्धेसाठी ट्रेन, बसची तिकिटे उपलब्ध न झाल्याने वडिलांच्या रिक्षाने आईसोबत मुंबईहून मालवण असा १६ तासांचा प्रवास करून मूळ काळसे येथील ऋतुजा राणे स्पर्धेत सहभागी झाली. अन् तिने विजेतेपद मिळवले.

Leave a Reply

error: Content is protected !!