राज्यसरकारची अकृषिक कर माफी मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांना नवसंजीवनी देणार

पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकणचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांचा विश्वास

पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांचे पर्यटन महासंघाकडून विशेष अभिनंदन

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित होऊन 28 वर्षे झाली असून सिंधुदुर्ग जिल्हा सोबत कोकण किनारपट्टीवर स्थानिक भूमिपुत्र पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. पर्यटकाना सुखसुविधा निर्माण करताना आपल्या राहत्या जागेत होम स्टे, न्याहरी निवास कृषी पर्यटन प्रकल्प उभारून पर्यटन सेवा देत आहेत. परंतु अश्या प्रकल्पासाठी सरकारची कुठलीही पॉलिसी नसल्याने प्रत्येक पर्यटन व्यवसायीकांना अकृषिक कर दंडापोटी हजारो रुपये शासनाला जमा करावे लागत होते. याविषयी टी टी डी एस व पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने स्थानिक प्रशासन तसेच राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला होता. याची दखल घेऊन महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशन 2023 मध्ये पर्यटन व्यावसायिक महासंघाने अकृषिक कराविषयी दिलेल्या निवेदनावर सकारात्मक चर्चा झाली होती. हल्लीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व  सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी टी टी डी एस व पर्यटन व्यावसायिक महासंघाने अकृषिक करासंबधी त्यांचे लक्ष वेधले होते त्यावेळी त्यांच्या सोबत माजी खासदार निलेश राणे उपस्थित होते. यावेळी त्यांनी सदर विषय हा राज्य सरकारचा पॉलिसी मॅटर असून लवकरच यावर आम्ही एकत्र मार्ग काढू असे सांगितले होते आणि जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना सदर कर आकारणी साठी स्थगितीचे आदेश दिले होते. काल झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या मिटींग मध्ये अकृषिक कर आकारणी रद्द करण्याचा निर्णय घेऊन रवींद्र चव्हाण यांनी पर्यटन व्यावसायिक महासंघास दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2000 पेक्षा जास्त होम स्टे धारकांना लाभ होणार असून कोकणातील 10000 पेशा जास्त पर्यटन व्यवसायिकांना लाभ होणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील 121 किमी वर राहत असलेल्या 25000 पेक्षा जास्त मच्छिमार कुटूंबाच्या राहत्या घरासाठी आकारण्यात आलेल्या अकृषिक करापासून कायमची मुक्तता होणार आहे. हा निर्णय कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांसाठी नवसंजिवनी देणारा ठरणार असून सामान्य नागरिकाचे 250 कोटी पेक्षा जास्त रक्कम माफ होणार आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांचे विशेष आभार मानत असल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघचे अध्यक्ष व महाराष्ट्र मत्स्यधोरण समिती सदस्य विष्णू मोंडकर यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!