मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून पर्यटनासाठी निधी कमी पडू देणार नाही
पर्यटन महोत्सवाच्या समारोप प्रसंगी आमदार वैभव नाईक यांची ग्वाही
मालवण नगरपालिकेच्या माध्यमातून दरवर्षी पर्यटन महोत्सव घेण्याची घोषणा
तीन दिवसांत मालवण हाऊसफुल्ल हेच महोत्सवाचं यश : आ. वैभव नाईक
कुणाल मांजरेकर
मालवण : कोरोना नंतरच्या काळात मालवणचं पर्यटन पुन्हा एकदा राज्याच्या नकाशावर आणणे आणि जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना महोत्सवाच्या माध्यमातून संधी देणे, हे दोन प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेऊन दांडी किनारी मालवण पर्यटन महोत्सवाची घोषणा करण्यात आली. पदाधिकारी, नगरपालिका कर्मचारी आणि दांडी ग्रामस्थांनी अतिशय कमी वेळेत मेहनत घेऊन हा महोत्सव कमालीचा यशस्वी करून दाखवला आहे. या तीन दिवसांत मोठ्या संख्येने पर्यटक मालवण मध्ये दाखल झाले, त्यामुळे मालवणचा पर्यटन महोत्सव यशस्वी ठरला असून या महोत्सवाच्या निमित्ताने दांडी किनारपट्टीची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. नगरपालिकेच्या वतीने दरवर्षी अशा स्वरूपाचा महोत्सव घेतला जाईल, अशी घोषणा आमदार वैभव नाईक यांनी मालवण पर्यटन महोत्सवाच्या समारोप प्रसंगी केली. आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून मालवणच्या पर्यटन विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही ते म्हणाले.
जिल्हा नियोजन समिती आणि मालवण नगरपालिकेच्या वतीने दांडी किनारी आयोजित करण्यात आलेल्या पर्यटन महोत्सवाचा समारोप रविवारी रात्री आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते संदेश पारकर, हरी खोबरेकर, महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे, सुशांत नाईक, पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, नितीन वाळके, छोटू सावजी, मंदार केणी, यतीन खोत, पंकज सादये, मंदार ओरसकर, दिलीप घारे, शेखर गाड, बाबी जोगी, आकांक्षा शिरपुटे, शिल्पा खोत, पूनम चव्हाण, शेखर गाड, अर्जुन मोंडकर, देवगड नगराध्यक्ष सौ. चैताली प्रभू , उपनगराध्यक्ष मिताली सावंत, बुवा तारी, अन्वय प्रभू यांच्यासह अन्य मान्यवर आणि दांडी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आ. वैभव नाईक यांनी दांडी येथील पर्यटन महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे आभार मानले. यावेळी ते म्हणाले, मालवण शहरात पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून या शहराच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मी पाठपुरावा करणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने दांडी बीच नव्या पद्धतीने पर्यटनाच्या नकाशावर आले आहे. आगामी काळात दांडी बीच सह येथील पर्यटन वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. या महोत्सवाला कलाकार किती मोठे आले, त्यापेक्षा त्यांनी कला कशा पद्धतीने साजरी केली, हे महत्त्वाचे आहे. दरवर्षी नगरपालिकेच्या वतीने हा महोत्सव घेतला जाईल, असे सांगून अशा उपक्रमांना पक्षभेद विसरून सर्वानी सहकार्य करणे आवश्यक आहे. नगरपालिकेच्या वतीने प्रथमच असा महोत्सव घेण्यात आला. कमी दिवसात हा महोत्सव भरवण्यात आला. त्यामुळे यामध्ये उणिवा असतील, तर निश्चितपणे पुढील वेळी त्या भरून काढल्या जातील. मालवण मध्ये पर्यटकांना सेवा देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील शासकीय विश्रामगृहाचे साडेचार कोटी रुपये खर्चून नूतनीकरण होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विकासासाठी आपण सांगू तेवढा निधी देण्यास तयार आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी निधी कमी पडणार नाही. आज दांडी गावातील लोकांनी महोत्सव यशस्वी केला आहे. प्रशासनाने देखील अतिशय चांगले काम केले असून मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी स्वतः यानी मेहनत घेऊन या महोत्सव यशस्वी केला आहे.
पावसाळ्यात स्थानिकांना पर्यटकांच्या आदरातिथ्याचे प्रशिक्षण देणार
मालवण मध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी स्थानिक व्यावसायिकांना पावसाळ्यामध्ये प्रशिक्षण देण्याची घोषणा आ. वैभव नाईक यांनी केली. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत येथे उपस्थित नसले तरी शहराच्या पर्यटन वाढीसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे आ. नाईक म्हणाले.
महोत्सवामुळे दांडी किनारपट्टीची नवीन ओळख : हरी खोबरेकर
आमदार वैभव नाईक, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी येथे महोत्सव भरवून दांडी किनारपट्टीची ओळख करून दिली आहे. येथे महोत्सवाचे आयोजन करताना मुख्याधिकाऱ्यांना थोडी धाकधूक होती. पण आम्ही जेवढे न्याय हक्कासाठी लढतो, त्या पद्धतीने आम्ही दांडी गावच्या उन्नतीसाठी सहकार्य करतो, हे दाखवण्यासाठी येथील प्रत्येक ग्रामस्थाने मेहनत घेऊन महोत्सव यशस्वी केला आहे₹ आगामी काळात दांडी बीच ते देवबाग किनारपट्टीवरून नवीन रस्ता करून किनारपट्टी पर्यटन अधिक वाढवण्याची संकल्पना शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य हरी खोबरेकर यांनी मांडली. राज्य शासनाच्या वतीने किनारपट्टीवर बीच शॅक आणली जाणार आहेत. यातील बीच शॅक दांडी किनाऱ्यावर देखील आणावे, त्या माध्यमातून येथे रोजगाराची नवीन संधी मिळेल. मच्छिमारी आणि पर्यटन हे येथील प्रमुख उद्योग आहेत. त्यामुळे रत्नसिंधुच्या माध्यमातून प्रयत्न करून हा परिसर अधिक विकसित करूया, असे श्री. खोबरेकर म्हणाले. तर माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी थोड्याच दिवसात आयोजन करून दांडी येथे पर्यटन महोत्सव यशस्वीपणे संपन्न झाला आहे, असे सांगून हा महोत्सव आयोजित करण्यात आमदार वैभव नाईक यांचे श्रेय आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मालवण मध्ये विकास सुरू नाही तर पळत आहे, असे ते म्हणाले.
यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी आपले विचार मांडताना महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रत्येक घटकांचे आभार मानले. तर नितीन वाळके, महेंद्र पराडकर यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रख्यात वृत्तनिवेदक ऋषी देसाई यांनी केले. यावेळी पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी दांडी ग्रामस्थांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करून यशस्वी करणाऱ्या आ. वैभव नाईक, मुख्याधिकारी संतोष जिरगे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मॅप इव्हेंटचे प्रणय तेली, वृत्तनिवेदक ऋषी देसाई यांच्यासह शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक, पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, देवगड नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.