सिंधुदुर्ग किल्ला एलईडी दिव्यांनी प्रकाशमान होणार ; शहरात पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक कार

पर्यटन महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी आ. वैभव नाईकांनी मांडला मालवण शहराच्या विकासाचा लेखाजोखा

तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून शहराच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना मांडण्याचीही ग्वाही

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण नगरपरिषद आणि जिल्हा नियोजन समिती यांच्या वतीने येथील दांडी बीचवर आयोजित करण्यात आलेल्या “जल्लोष २०२२” या पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी उशिरा संपन्न झाला. याप्रसंगी आमदार वैभव नाईक यांनी भविष्यातील मालवण शहराच्या विकासाचा लेखाजोखा सादर करताना यापुढील काळात तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून या शहराच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना मांडून त्याची पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. देशी विदेशी पर्यटक सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी मालवणात येतात. हा किल्ला राजस्थानच्या धर्तीवर एलईडी दिव्यांनी प्रकाशमान करण्यात येणार आहे. यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी केल्यानुसार त्यांनी ५ कोटी रुपये मंजूर केले असून लवकरच एलईडी विद्युतीकरणाचे काम सुरू होईल. मालवण शहरात पार्किंगचे काम सुरू असून या ठिकाणहून पर्यटकांना इलेक्ट्रिक गाड्यानी जेटीकडे आणले जाईल, असे सांगतानाच मालवण शहराच्या भुयारी विद्युत वाहिनीचे कामही नजीकच्या काळात हाती घेण्यात येईल, अशी माहितीही आमदार वैभव नाईक यांनी दिली. मालवणचा पर्यटन महोत्सव जाहीर केल्यानंतर या परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. हेच या महोत्सवाचे यश असल्याचे ते म्हणाले.

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच सिने नाट्यअभिनेते विजय पाटकर आणि दिगंबर नाईक यांच्या हस्ते नटराजाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते संदेश पारकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे , तहसीलदार अजय पाटणे, जिल्हा बँक संचालक मेघनाद धुरी, मंदार केणी, यतीन खोत, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नितीन वाळके, छोटू सावजी, दिलीप घारे, मंदार ओरसकर, पंकज सादये, उमेश मांजरेकर, सारस्वत बँकेच्या व्यवस्थापक शीतल सामंत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

अभिनेते दिगंबर नाईकांनी केलं महोत्सवाचं कौतुक ; मालवणी गाऱ्हाणं ठरलं लक्षवेधी

सध्या गर्मी आणि पावसाळी वातावरण असतानाही जिल्ह्याचा आणि तालुक्याचा विचार करून वैभव नाईक यांनी आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवाचे अभिनेते दिगंबर नाईक यांनी कौतुक केले. कोकणात आल्यावर प्रत्येक दिवस पर्यटन महोत्सव असतो. कोकण हे कॅलिफोर्नियाच आहे आणि हे सौंदर्य टिकवून ठेवण्याचं काम मालवणी माणसाने केलं आहे, असं सांगून मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचं त्यांनी कौतुक केलं. हा महोत्सव प्रशासनाने करू देत किंवा शासनाने समोर बसलेल्या माणसाला आनंद मिळतो हे माझ्यासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगून आमदार वैभव नाईक यांनी लोकांना आनंद मिळवून देण्याचं काम प्रखरपणे करून दाखवलं आहे. असे महोत्सव दरवर्षी नगरपालिकेने करत राहू देत, असे सांगून हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी त्यांनी आपल्या खास मालवणी शैलीतून गाऱ्हाणे घातले. यावेळी आमदार वैभव नाईक यांना लवकरात लवकर कॅबिनेटमंत्री पद मिळण्यासाठी देखील त्यानी साकडं घातलं.
तर मालवणचा पर्यटन महोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने आयोजित करण्यात आल्याबद्दल आमदार वैभव नाईक आणि मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे अभिनेते विजय पाटकर यांनी कौतुक केले.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, मालवण शहरात पर्यटक आले पाहिजेत, या उद्देशाने हा पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी ही संकल्पना मांडली आणि आम्ही सहकार्य केले. त्याला आज मूर्त स्वरूप आले आहे. शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी आणि दांडी ग्रामस्थांनी उत्साहाने पुढाकार घेऊन देखण्या स्वरूपात या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या विभागाचा आमदार म्हणून विकासाबरोबरच येथील पर्यटकांना चांगल्या सुविधा देणे आपले कर्तव्य असल्याचे सांगून पर्यटकांसाठी पाणी, चांगले रस्ते, वाहनतळ दिले पाहिजे. या वेगवेगळ्या संकल्पना मांडून मालवण शहरात विकासासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. शहरातील वाहनतळाचे काम सुरू असून या ठिकाणी ६० ते ७० गाड्या सहजपणे पार्किंग होऊ शकतील. येथून इलेक्ट्रिक गाड्यांद्वारे पर्यटकांना किल्ल्यापर्यंत आणण्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी होणार आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याकडे मोठ्या संख्येने पर्यटक आकर्षित होतात. या पर्यटकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराजेश्वर मंदिराचे सुशोभीकरण पूर्ण करून घेतले असून महाराजांच्या आसनाचे काम देखील हाती घेतले जाणार आहे. राजस्थान प्रमाणे सिंधुदुर्ग किल्ला रात्रीच्या अंधारात झळाळण्यासाठी किल्ल्यावर एलईडी लाईट बसवली जाणार असून त्यासाठी आदित्य ठाकरे यांनी ५ कोटी रुपये निधी उपलब्ध केला आहे. तसेच येथे टर्मिनल उभारण्यात आले असून फिश एक्वेरियमसाठी २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आल्याचे आ.वैभव नाईक म्हणाले.

अत्याधुनिक क्लिनिंग मशीनने होणार किनारपट्टी स्वच्छता

मालवणचा समुद्र किनारा अतिशय सुंदर असून हा किनारा विकसित केला पाहिजे. पर्यटक मोठ्या संख्येने याठिकाणी येतील, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने बीच क्लीनिंग मशीन आणली आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील पहिली क्लीनिंग मशीन मालवण साठी उपलब्ध करून दिली असून त्याद्वारे मालवण पासून देवबाग पर्यंतच्या किनारपट्टीची स्वच्छता केली जाणार आहे, असे आ. नाईक म्हणाले.

पर्यटन महोत्सवासाठी पालिकेचा एक रुपयाही नाही

राजकिय आरोप नेहमी होत असतात. मालवण नगरपालिकेच्या वतीने या महोत्सवासाठी प्रामाणिक मेहनत घेतली जात असून या महोत्सवासाठी नगरपालिकेचा एक रुपयाही निधी वापरला जात नसल्याचे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले. हे शहर आपलं आहे, येथील लोकं आपली आहेत, या भावनेतून मालवण शहराला प्रमोट करण्यासाठी मालवण नगरपालिकेच्या बॅनरखाली हा महोत्सव घेतला जात असून येत्या काळात सातत्याने असे महोत्सव घेऊन येथील पर्यटनाला उभारी देण्याचे काम केले जाईल, असे आ. वैभव नाईक म्हणाले.

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी शहरातील अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. पावसाळी कामे देखील लवकरात लवकर पूर्ण केली जाणार असून भुयारी विद्युत वाहिनी, पार्किंग सुविधा आदी कामे देखील पूर्ण केली जाणार आहेत, असे आ. वैभव नाईक म्हणाले. यावेळी अभिनेते विजय पाटकर, दिगंबर नाईक, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रख्यात वृत्तनिवेदक ऋषी देसाई यांनी केले.

वैभव नाईक जनतेचा विचार करणारे आमदार : संदेश पारकर

नगरपालिका कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत आणि त्याला मालवणच्या जनतेने दिलेली साथ यांमुळेच हा महोत्सव यशस्वी होत आहे. लहान मुलांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आमदार वैभव नाईक आणि मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी घेतले असून मालवण शहराला पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. या महोत्सवातून येथील मच्छिमारांना, येथील व्यापाराला समृद्धी मिळेल. पालिकेवर प्रशासक असताना हा महोत्सव का घ्यावा, असा विचार आला असता. पण वैभव नाईक यांनी पक्षीय दृष्टीकोन बाजूला ठेवून जनतेला आनंद देण्यासाठी हा महोत्सव घेतला आहे. या पाच ते सात वर्षात कुडाळ- मालवण मध्ये जवळपास १०० ते २०० कोटींचा निधी हा आणण्याचे काम वैभव नाईक यांनी केला आहे. बजेटमध्ये जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी ते प्रयत्न करतात. भविष्यात आणखी पाचवेळा ते या मतदार संघाचे आमदार होतील. भविष्यात कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी मिळावी, अशा सदिच्छा संदेश पारकर यांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

error: Content is protected !!