पर्यटन व्यावसायिकांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार : अविनाश सामंत
मालवण (प्रतिनिधी) : कोरोनामुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय आज डबघाईला आला आहे. पर्यटन व्यावसायिकांच्या समस्यांबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवण शाखेचे तालुकाध्यक्ष अविनाश सामंत यांनी दिली आहे.
पर्यटन व्यवसाय हा केवळ हॉटेल व्यवसायापूरता मर्यादित नसून यात अनेक घटक यात समाविष्ट आहेत. त्यामुळे येथील पर्यटनाला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यात पर्यटन व्यवसायाशी निगडित घटकांच्या विविध आघाड्या स्थापन करून त्यांच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याचेही श्री. सामंत यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक येथील हॉटेल सायबा येथे पार पडली. या बैठकीस महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, उपाध्यक्ष डी. के. सावंत, खजिनदार नकुल पार्सेकर, सतीश पाटणकर, जितेंद्र पंडित, मालवण अध्यक्ष अविनाश सामंत, मंगेश जावकर, मिलिंद झाड, जिल्हा विदेशी मद्य विक्रेता संघटनेचे अध्यक्ष शेखर गाड, दादा वेंगुर्लेकर, डॉमनिक ब्रिटो, मिलिंद परुळेकर, तुळशीदास कोयंडे, गणेश पाडगावकर, समिधा मांजरेकर, सौ. अन्वेषा आचरेकर, मेघा सावंत, उदय गावकर, गुरुनाथ राणे, भालचंद्र राऊत, कन्हैया तांडेल आदी उपस्थित होते. या बैठकीची माहिती श्री सामंत यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे
पर्यटन व्यवसायात हॉटेल व्यावसायिकांबरोबरच वाहतूक व्यावसायिक, सहकार क्षेत्र, व्यापारी, ग्रामीण भागातील पर्यटन व्यावसायिक आदी अनेकांचा समावेश होतो. या सर्वांना एकत्र आणून पर्यटनाशी जोडण्याचा प्रयत्न विविध आघाड्या स्थापन करून करण्यात येणार आहे. पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या प्रत्येक तालुकानिहाय व पर्यटन गाव निहाय आघाड्या स्थापन करण्यात येऊन त्यांच्या कार्यकारिणी देखील लवकरच नियुक्त करण्यात येणार आहे. गेले दीड वर्ष कोरोना महामारी, लॉकडाऊन यामुळे सर्वच पर्यटन व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. येत्या काळात जिल्ह्यातील सर्व पर्यटन व्यवसायिकांची एकत्रित मोट बांधून पर्यटन व्यावसायिकांच्या समस्यांबाबत लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.