तौक्ते वादळात शिवसेनेकडून आलेलं साहित्य मंदार केणींनी स्वतः लाटलं ; सुदेश आचरेकर यांचा गौप्यस्फोट
नगरपालिकेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमावेळी आम्ही जमा केलेली रक्कम पालिकेत जमा ; हिशोब मागायचाच असेल तर नगराध्यक्ष अथवा पालिका प्रशासनाकडे मागा
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवणात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आणि माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्यातील शाब्दिक द्वंद्व अद्यापही सुरूच आहे. सुदेश आचरेकर यांनी पालिकेच्या शतक महोत्सवावेळी व्यापाऱ्यांकडून जमा केलेल्या रक्कमेचा हिशोब दयावा, असे आवाहन करणाऱ्या मंदार केणींवर आचरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे. आम्ही जमा केलेली रक्कम संबंधित व्यापाऱ्यांच्या हस्ते त्याचवेळी नगरपालिकेत नगराध्यक्षांकडे जमा केली आहे. त्यामुळे मंदार केणींना हिशोब मागायचाच असेल तर तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर किंवा पालिका प्रशासनाकडे मागावा, एवढं साधं लॉजिकही त्यांना नाही, असे उत्तर सुदेश आचरेकर यांनी दिले आहे. मंदार केणींनी स्वतः बिल्डरांकडून पैसे जमा करतो, याची कबुली देताना हे पैसे आपण शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी खर्च करत असल्याचे म्हटले आहे. मात्र ज्या केणींनी कधी उष्ट्या हाताने कावळा हाकला नाही, ते लोकांना मदत काय करणार ? तौक्ते वादळात शिवसेना खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी मालवणसाठी दोन कंटेनर भरून पत्रे, कौले आणि ताडपत्री पाठवल्या होत्या. यातील एक कंटेनर मधील साहित्य मंदार केणींनी हडप करीत स्वतःच्या हॉटेलला वापरल्याचा आरोप यावेळी सुदेश आचरेकर यांनी केला आहे.
येथील भाजपा कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, भाऊ सामंत, महेश सारंग, विलास मुणगेकर, मोहन वराडकर, प्रमोद करलकर आदी उपस्थित होते.
७.४५ नंतर मंदार केणी कोमात !
यावेळी सुदेश आचरेकर म्हणाले, मंदार केणी यांनी माझ्याशी पंगा घेऊ नये. मंदार सारखे आले किती गेले किती, याची गणती देखील आम्ही करत नाही. झोलर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदार केणी याचे अनेक कारनामे आमच्याकडे आहेत. त्यामुळे चिटर मंदार केणी याने माझ्या नादी लागू नये, असा इशारा सुदेश आचरेकर यांनी दिला. मंदार केणीचा इतिहास नाही तर भूगोल आम्हाला माहित आहे. तो ज्या पक्षात जातो त्या पक्षाशी कधीही प्रामाणिक राहत नाही. आपले मनसुबे साध्य करण्यासाठी कुठल्याही थराला जाण्यासाठी गद्दारी त्याच्या नसानसात भरली आहे. मी वेल सेटल असून मला माझ्या भविष्याची चिंता नाही. त्यामुळे मला निवांत झोप लागते. पण मंदार केणी सायंकाळी ७.४५ नंतर कोमात जातो. त्याला झोप लागण्यासाठी नेहमी ७.४५ चा आधार घ्यावा लागतो. ही व्यक्ती ७.४५ नंतर नेहमीच कोमात असते, अशी जहरी टीका सुदेश आचरेकर यांनी केली. मंदार केणीला स्वतःच्या वार्डात स्थान नाही. अलीकडेच धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिराच्या कलशारोहणा निमित्त मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंदार सोबत कोणीही कार्यकर्ता नव्हता. त्यामुळे स्वतः हातगाडी ढकलण्याची वेळ त्याच्यावर आली. काही करपट मंडळी सोडली तर एकही निष्ठावंत कार्यकर्ता त्याच्याकडे शिल्लक राहिलेला नाही असे आचरेकर म्हणाले.
माझी, माझ्या वडिलांची पालिकेवर ५० वर्षे निर्विवाद सत्ता
मी आणि माझ्या वडिलांनी सुमारे ५० वर्षे मालवण नगरपालिकेवर निर्विवाद सत्ता ठेवली. यातून आम्ही इतिहास निर्माण केला आहे. पालिकेत काम करताना आम्ही भरपूर प्रतिष्ठा मिळवली. मी स्वतः नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वेळा नगराध्यक्ष म्हणून काम करण्याचा बहुमान मिळविला. याचे शल्य केवळ मंदार केणीच नव्हे तर अन्य पक्षातील नेतेमंडळीनाही आहे. मालवण नगरपालिकेत आले किती आणि गेले किती, ते आज खिसगणतीतही नाहीत. मंदार केणी देखील यामधील एक आहेत. पण आम्ही खंबीरपणे आजही उभे आहोत आणि उद्याही उभे असू असा विश्वास सुदेश आचरेकर यांनी व्यक्त केला. माझ्या कारकिर्दीत मामा वरेरकर नाट्यगृह, रॉकगार्डन, चिवला बीच सुशोभीकरण, बंदर जेटी सुशोभीकरण, मच्छिमार्केट नूतनीकरण, भुयारी गटार योजना यांसारख्या अनेक कामांना चालना मिळाल्याची आठवण सुदेश आचरेकर यांनी करून दिली.
तौक्ते वादळावेळी शिवसेना खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी दोन वेळा कंटेनर भरून सिमेंटचे पत्रे, ताडपत्री आणि कौले वादळग्रस्तांसाठी पाठवली होती. अडचणीत सापडलेल्या येथील जनतेला दिलासा देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र यातील एक कंटेनरचे सामान मंदार केणी याने स्वतःच्या हॉटेलसाठी वापरले. गोरगरीब जनतेपर्यंत ही मदत सुद्धा पोहोचू दिलेली नाही. एवढेच नाही तर तो स्वतःचे सांगत असलेले हॉटेलही दुसऱ्याच्या मालकीचे असून हा मालक अलीकडे मालवणात आला होता. त्यावेळी मंदार केणी लपून बसल्याची चर्चा आहे. राजकीय कट्टा ग्रुपवर त्याच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी याचे वाभाडे काढले असून त्याचे स्क्रीन शॉट आमच्याकडे आहेत. योग्य वेळ येताच हे स्क्रीनशॉट बाहेर काढले जातील. २५ वर्षात झाला नाही एवढा भ्रष्टाचार या दोन वर्षात मंदार केणीने केल्याचे त्याच्याच पक्षाचे पदाधिकारी सांगताना यामध्ये दिसत आहेत. वैभव नाईक यांच्यावर या व्यक्तीने काँग्रेसमध्ये असताना ४०० रुपयाची ताडपत्री ५०० रुपयाला विकण्याचा धंदा करत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे आपले हे कोकरू कसे आहे, हे अजून आमदारांनाही समजलेले नाही. त्यापासून आमदारांनी सावध राहावे, असे सुदेश आचरेकर म्हणाले.
“त्या” गरीब कामगारांचा पगार दे, नाहीतर तळतळाट लागेल
मंदार केणी यांनी नगरपालिकेत काम करताना दलित वस्तीमधील कर्मचाऱ्यांना देखील सोडले नाही. नगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापनाचा ठेकेदार मंदार केणी यांच्या मर्जीतील होता. त्याने कचरा गाडीवर नेमलेल्या सफाई कामगारांचा तीन महिन्यांचा पगार तीन वर्षे उलटला तरी अद्याप दिलेला नाही. त्यामुळे हे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मंदार केणी यांच्या नावाने आजही रडत आहेत. हा रखडलेला पगार तात्काळ दे, नाहीतर या कुटुंबांचा तळतळाट लागून नगरपालिका निवडणुकीत तू भुईसपाट होशील, असे आचरेकर म्हणाले.
मंदार केणी कॉलेजचे हुशार विद्यार्थी, सध्या हॉटेलवर थाटलय कॉलेज
मंदार केणी हे शाळेचे नव्हे तर कॉलेजचे विद्यार्थी आहेत. हे एवढे हुशार आहेत की तीन वर्षाची डिग्री एका वर्षात घेऊन शंभर पैकी शंभर गुण मिळवित ते या कॉलेजच्या प्राचार्य बनले. त्याच अनुभवाचा वापर करून शिवसेना संघटनेचे कॉलेज करायला ते मागेपुढे पाहणार नाहीत, असा टोला सुदेश आचरेकर यांनी लगावला. सध्या कॉलेज बंद असल्याने स्वतःच्या हॉटेलवर त्यांनी कॉलेज सुरू केले आहे. आणि त्याठिकाणी त्यांच्या जोरदार मैफिली रंगत आहेत, असेही ते म्हणाले. डोळे बंद करून दूध पिणाऱ्या मांजराला वाटत असतं आपल्याला कोणी पाहत नाही, पण जेव्हा त्याच्या पाठीवर दांडा बसतो, तेव्हा ते सैरावैरा पळत सुटते. केणींची अवस्था देखील त्या मांजरा प्रमाणे झाली आहे, त्यांना वाटतंय की त्यांचा भ्रष्टाचार कोणी पहात नाही, पण जनता सर्व काही उघड्या डोळ्यांनी पहात असून येत्या निवडणूकीत त्यांच्या पाठीवर सोटा मारल्या शिवाय राहणार नाही, असे श्री. आचरेकर म्हणाले.