मंदार केणी : जनसामान्यांचा आधारवड !

कुणाल मांजरेकर : मालवण

मंदार मोहन केणी… अवघ्या ४० वर्षांचा हा तरुण आज मालवणच्या राजकिय क्षेत्रातील चाणक्य म्हणून ओळखला जातोय. कोणतीही राजकिय पार्श्वभूमीवर नसताना २००६ मध्ये वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी मालवण नगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर तब्बल तीन वेळा धुरीवाडा प्रभागातून नगरसेवक पदाची हॅट्रिक साध्य करीत विरोधकांना जेरीस आणण्याचं काम त्यांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस मधून आपल्या राजकीय इनिंगचा श्री गणेशा करणारे मंदार केणी आज शिवसेनेत कार्यरत आहेत. मालवण नगरपालिकेवर तीन टर्म नगरसेवक म्हणून काम करताना अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याचा धडाका पाहून आ. वैभव नाईक यांच्या शिफारशीने संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाला न्याय देताना गोरगरीब जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी केलंय. आज ११ मे रोजी मंदार केणी यांचा ४० वा वाढदिवस ! त्यानिमित्ताने त्यांचा कार्याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा….

राजकारणात काम करण्यासाठी, प्रगतीची उंच शिखरे गाठण्यासाठी तुम्ही एखाद्या राजकीय घरातच जन्म घेण्याची आवश्यकता नाही, हे हाताच्या बोटावर मोजता येईल, अशा थोडक्याच लोकांनी सिद्ध करून दाखवलं आहे. यापैकीच एक व्यक्ती म्हणजे मालवण नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती मंदार मोहन केणी ! तुमच्या कार्याबद्दल जर तुम्हाला निष्ठा असेल, तहान-भूक-वेळ विसरून जनतेसाठी काम करण्याची तयारी असेल तर तुम्हीही आदर्श नेता होऊ शकता, हे मंदार केणी यांनी दाखवून दिलं आहे. मंदार केणी यांच्या कुटूंबाचा राजकारणाशी दुरान्वये देखील संबंध नाही, असे असताना या व्यक्तीने तब्बल तीन टर्म नगरसेवक म्हणून निवडून येतानाच राजकीय क्षेत्रात दिग्गजांना धूळ चारली आहे.

वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी नगरसेवक पदाचा बहुमान

११ मे १९८२ रोजी मालवण शहरातील धुरीवाडा येथे मंदार केणी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मोहन केणी हे किराणा व्यावसायिक तर आई सर्वसामान्य गृहिणी… मंदार केणी यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयीन जीवनातच समाजसेवेचे व्रत त्यांनी जोपासले होते. मात्र त्याला राजकीय वास कसुभरही नव्हता. आपण ज्या समाजात जन्माला आलो, त्या समाजाचे काहीतरी देणं लागतो, म्हणून आपल्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांना मदत करण्याचे धोरण त्यांनी ठेवलं. २००२ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही समाजकार्याचा घेतलेला वसा त्यांनी कायम ठेवला. या दरम्यान २००६ सालची नगरपालिका निवडणूक जाहीर झाली. यावेळी धुरीवाडा प्रभागातील मित्र परिवार आणि नागरिकांच्या आग्रहाखातर पालिका निवडणूकीत उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवताना कोणीही बडी आसामी त्यांच्या पाठीशी नव्हती. पाठीशी होते ते गोरगरीब जनतेचे आशीर्वाद ! त्या बळावर मंदार केणी यांनी निवडणूक रिंगणात उतरून पालिकेच्या रिंगणात पहिला विजय मिळवला. त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं २४ वर्ष ! त्यावेळी मंदार केणी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ नगरसेवक निवडून आले होते. यामध्ये काही ज्येष्ठ असताना सुद्धा मंदार केणी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालिकेतील गटनेते पदाची जबाबदारी देण्यात आली.

नगरपालिकेत विजयाची हॅट्ट्रिक

आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करीत सर्वसामान्य जनतेला आपल्या पदाचा उपयोग करून देण्याच्या उद्देशाने त्यांनी सामाजिक कार्य सुरू ठेवलं. आपल्या वार्डातीलच नव्हे तर शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत पालिकेच्या माध्यमातून त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्याकाळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसकडे जिल्ह्यातील बहुतांश सत्तास्थाने होती. त्यामुळे नारायण राणेंच्या माध्यमातून आपल्या जनतेच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याच्या उद्देशाने २०१० मध्ये मंदार केणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस मध्ये काम करत असताना त्यांच्या कार्याने स्वतः नारायण राणे देखील प्रभावित झाले होते. यानंतर झालेल्या २०११ आणि २०१७ च्या नगरपालिका निवडणूकीतही मंदार केणी यांनी विजय मिळवला. २०१७ ची निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नव्हती. मंदार केणी यांच्या पराभवासाठी राज्यातील एक बडा नेता आसुसलेला होता. त्याने मंदार केणी यांच्या प्रभागात जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र सर्वसामान्य मतदारांशी नाळ जोडली गेल्याने त्यांच्या राजकीय विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळाले. अन् २०१७ च्या निवडणूकीत मंदार केणी विजयाची हॅट्रिक करून नगरपालिकेत निवडून आले.

नगरसेवक ते तालुकाध्यक्ष पदापर्यंत प्रवास

दरम्यानच्या काळात २०१४ मध्ये सिंधुदुर्गच्या राजकिय क्षेत्रात मोठी उलथापालथ झाली होती. तब्बल २५ वर्ष सिंधुदुर्गात एकहाती सत्ता घेऊन असलेल्या नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांना लोकसभा निवडणूकीत तर स्वतः नारायण राणे यांना विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे २०१७ मध्ये काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाची धुरा कोणाकडे द्यायची, या विचारात राणे असताना तालुकाध्यक्ष पदासाठी मंदार केणी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आजपर्यंत केवळ शहरापुरते मर्यादित असलेले मंदार केणी यांचे नेतृत्व ग्रामीण भागातही सर्वदूर पसरले. ग्रामीण भागात पक्ष संघटनेचा विस्तार करताना त्यांनी आपल्या प्रभागाकडे लक्ष कमी होणार नाही, याची कटाक्षाने काळजी घेतली. मालवणमध्ये काँग्रेसच्या नगरपालिकेतील गटाचे गटनेते पद देखील त्यांच्याकडेच देण्यात आले होते. मात्र आपल्याला मिळलेल्या प्रत्येक पदाला न्याय देण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. मंदार केणी यांच्या कामामुळे त्यांची लोकप्रियता वाढत होती.

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

कोवळ्या वयात तीनदा नगरसेवक आणि काँग्रेससह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष पद सांभाळणाऱ्या मंदार केणी यांचे नेतृत्व सर्वमान्य बनले होते. या दरम्यान नारायण राणे यांनी लोकसभा निवडणूकी नंतर स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजप मध्ये विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. मात्र मंदार केणी यांनी भाजपमध्ये न जाता शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्याने प्रेरित होऊन आणि शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या विकास कामांच्या झंझावातामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील चार सहकारी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेतील प्रवेश त्यांच्या राजकीय वाटचालीत मैलाचा दगड ठरला. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या खांद्याला खांदा लावून शहर विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले. प्रभागातील जनतेचे प्रश्न सत्तेच्या माध्यमातून सोडवताना जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कामामुळे प्रेरित होऊन आमदार वैभव नाईक यांनी संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली. हा समितीच्या माध्यमातून मंदार केणी यांनी तळागाळातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळवून दिले. संजय गांधी योजना समितीच्या बैठकीत यापूर्वी केवळ २०-२५ प्रकरणे मंजूर होत. मात्र मंदार केणी यांनी अध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यानंतर एकाच बैठकीत १०० -१०० प्रकरणे मंजूर करून घेतली. एवढेच नाही तर अलीकडे मामा वरेरकर नाट्यगृहात संजय गांधी योजनेचे विशेष शिबिर घेताना अडीचशे हून अधिक जणांना एकाच ठिकाणी विविध दाखले मिळवून दिले. तर आचऱ्यात देखील असा कॅम्प घेताना स्थानिक ग्रामस्थांची मोठी अडचण दूर केली.

२०१८ मध्ये नारायण राणेंनी काँग्रेस मधून बाहेर पडत स्वतःच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. यावेळी देखील स्वाभिमानच्या मालवण तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी मंदार केणी यांच्यावर देण्यात आली होती. तालुकाध्यक्ष म्हणून मंदार केणी यांची कारकीर्द वाखाणण्याजोगी राहिली.

कोविड काळातील खरा कोरोना योद्धा ते आरोग्य दूत

दोन वर्षां पूर्वी आलेल्या कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार उडवला होता. या काळात प्रत्येक जण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडत होता. आपल्या गावाबाहेर असणाऱ्या स्वतःच्या सग्यासोयऱ्यानाही गावात घेण्यास स्थानिक नागरिक घाबरत होते. त्याकाळात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांच्या सावलीला रहाणे म्हणजे जीवघेणा प्रकार होता. त्या परिस्थितीत मंदार केणी यांनी मालवण मधील शासकीय कोविड सेंटरमध्ये कोरोना योध्दा म्हणून काम करताना या ठिकाणी दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाची जातिनिशी काळजी घेतली. प्रत्यक्ष कोविड वॉर्डमध्ये जाऊन रुग्णसेवा करताना स्वतःच्या जीवाची पर्वा देखील त्यांनी केली नाही. शहरातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापासून ते पुढे कोरोनाने मयत झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही मंदार केणी यांनी पुढाकार घेतला. रुग्णांना औषधांचा पुरवठा करण्यासाठी स्वतः प्रयत्न केले. मालवणचे कोविड सेंटर असो अथवा जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर या दोन्ही ठिकाणी स्वतः जातीनिशी जाऊन रुग्णांना सहकार्य करण्याचे काम त्यांनी केले. केवळ कोरोना काळातच त्यांनी रुग्णसेवा केली असं नाही तर यानंतरच्या काळात देखील जनतेचे आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं आहे. आजही आठवड्यातील तीन ते चार दिवस ते जिल्हा रुग्णालयात किंवा मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना घेऊन असतात. या २ महिन्यातच त्यांनी मोतीबिंदू, हर्नियाची जवळपास ४४ ऑपरेशन मोफत करून दिली आहेत. त्याशिवाय मुंबईसह अन्य कुठेही मोठी ऑपरेशन असतील तर योग्य ते सहकार्य करण्यात त्यांचा पुढाकार असतो. त्यामुळे कोरोना योध्दा ते आरोग्य दूत अशी वेगळी ओळख मंदार केणी यांनी निर्माण केली आहे.

मागील वर्षी मालवण शहराला तोक्ते वादळाचा मोठा फटका बसला होता. त्यावेळी आमदार वैभव नाईक स्वतः मदतकार्यासाठी रस्त्यावर उतरले होते. यामध्ये मंदार केणी यांनी देखील हिरीरीने सहभाग घेतला। अनेकांना घरदार उभारण्यासाठी मदत केली. तर अनेकांच्या संसाराला उभे करण्यासाठी हातभार लावला.

मंदार केणी यांचं नेतृत्व आज मालवण शहरात लोकमान्य नेतृत्व म्हणून उदयाला येत आहे. मंदार केणी सातत्यानं निवडून कसा येतो, हे पाहायचं असेल तर एकदा त्याच्या वार्डात फेरफटका मारून येणं आवश्यक ठरेल. त्याच्या वॉर्डातील अनेकांचे संसार आज मंदार ने उभे केले आहेत. वॉर्डातील कोणतेच विकासाचे प्रश्न त्याने शिल्लक ठेवले नसून किरकोळ प्रश्न शिल्लक असतील तर आमचा मंदार ते नक्की मार्गी लावणार, हा विश्वास त्याच्या वॉर्डातील जनतेमध्ये दिसून येतो. यातील काही नागरिकांनी आपल्या प्रातिनिधिक भावना यावेळी कोकण मिरर कडे व्यक्तही केल्यात. “आमचो मंदार लाखात एक, माझ्या आयुष्यात त्याच्या सारखो नगरसेवक बघलय नाय, अशा प्रतिक्रिया येथील कोणत्याही राजकारणाचा गंध नसलेल्या सर्वसामान्य नागरिक, महिला वर्गाने दिल्या आहेत, आणि हीच मंदार केणी यांच्या १५ वर्षांच्या राजकिय कामाची पोचपावती आहे. राजकारणात काम करताना टीका टिपण्णी होतच राहणार. खरं म्हटलं तर ज्या झाडाला आंबे अधिक त्याच झाडावर दगड बसणार हा समाजनियम आहे. त्यामुळे आजच्या वाढदिनी मंदारला शुभेच्छा देताना त्याच्या हातून समाजसेवेचं व्रत असंच अखंडपणे सुरू राहो, याच सदिच्छा !

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!