आचरेकर आणि टीमने जमा केलेली रक्कम नगराध्यक्षांकडे जमा झाली की नाही संशोधनाचा विषय !

मंदार केणींचा सुदेश आचरेकर यांच्यावर हल्लाबोल ; कोणताही उद्योगधंदा नसताना आचरेकर यांचा राजेशाही थाट कसा ?

आचरेकरांचा संपूर्ण पिक्चर आमच्याकडे ; पिक्चर दाखवला तर त्यांना घराबाहेर पडणेही मुश्कील होणार असल्याची टीका

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण मध्ये माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आणि माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्यातील शाब्दिक द्वंद्व अधिकच भडकले आहे. आचरेकर यांनी शनिवारी केणींवर केलेल्या जहरी टिकेनंतर केणींनी देखील आचरेकर याना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पालिकेच्या शतक महोत्सवासाठी आपण कोणतीही रक्कम जमा केलेली नाही. पण तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी कोणतीही मागणी केली नसताना सुदेश आचरेकर आणि त्यांच्या टीमने शहरातील काही व्यापाऱ्यांकडून शतक महोत्सवासाठी पैसे जमा केले. मात्र ही संपूर्ण रक्कम नगराध्यक्षांकडे जमा झाली का, हा संशोधनाचा विषय आहे, त्यामुळे सुदेश आचरेकर यांनी शतक महोत्सवाचा हिशोब जनतेला द्यावा, असे सांगून कोणत्याही प्रकारचा उद्योगधंदा नसतानाही आचरेकर आजही राजेशाही पद्धतीने कसे जगत आहेत ? असा सवाल मंदार केणींनी केला आहे. पालिकेचे नाट्यगृह ज्या ठिकाणी आहे, त्याठिकाणी पूर्वी एक शाळा होती. त्या शाळेत सुदेश आचरेकर हे हुशार विद्यार्थी होते. शाळेतील अतिहुशार म्हणून ते पहिल्या क्रमांकाने पास होतील, म्हणून आचरेकर यांच्या वडिलांनी ती शाळाच बंद करून टाकली. त्यामुळे आचरेकर यांनी आमच्यावर टीका करताना त्यांचाही पिक्चर आमच्याकडे आहे, याची जाण ठेवावी. ते सध्या नजरकैदेत असून आम्ही त्यांचा पिक्चर दाखवला, तर त्यांचे घरातून बाहेर पडणेही कठीण होईल, त्यामुळे आम्हाला धमकी देण्याचा प्रयत्नही करू नका, अशा शब्दांत मंदार केणी यांनी सुदेश आचरेकर यांचा समाचार घेतला आहे.

शिवसेना तालुका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषेदत श्री. केणी बोलत होते. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेविका सेजल परब, उमेश मांजरेकर, नरेश हुले, प्रसाद आडवणकर आदी उपस्थित होते. मंदार केणी यांनी सुदेश आचरेकर यांनी शतक महोत्सवात गोळा केलेल्या पैशांवरून केलेल्या टिकेचा यावेळी समचार घेतला. आचरेकरांच्या टिकेला आपण उत्तर दिल्यानंतर त्यांची मनस्थिती बिघडली आहे. तसेच त्यांना सर्वत्र याबाबत विचारले जात असल्याने त्यांचे संतुलनही बिघडले आहे. यामुळे आता त्यांनी राजकीय निवृत्तीचा विचार करावा, असेही श्री. केणी म्हणाले. आचरेकर सत्तेत नसल्याने गेल्या पाच वर्षात ठेकेदार आणि अधिकारी यांनी मालवण पालिकेत काम करताना मोकळा श्वास घेवून कामे केली आहेत. यामुळे भ्रष्टाचार होण्याचा प्रश्नच येत नाही. आचरेकर यांची यात आर्थिक गणीते बिघडल्यानेच त्यांच्याकडून शहरात सुरू असलेल्या विकासकामांवर चुकीच्या पद्धतीने टिका केली जात आहे. आगामी पालिका निवडणुकीत आचरेकर उभयतांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास त्यांची पक्षाच्या नेत्यांबाबत आणि पदाधिकारी यांच्याबाबत असलेली भूमीका जनतेसमोर लवकरच येणार आहे. तत्पूर्वीच आचरेकर यांनी आता निवृत्ती घेवून नविन चेहऱ्याला संधी देण्याची वेळ आली आहे, असाही उपरोधिक टोला श्री. केणी यांनी मारला आहे.

“त्या” पैशांतून सामाजिक उपक्रम

कोरल, समर्थ, प्राईड याचबरोबर शहरातील इतरही बिल्डर यांच्याशी आपले मैत्रीचे संबंध आहेत. त्यांच्याकडून सामाजिक उपक्रमांसाठी आपल्याला आर्थिक सहकार्य मिळत असते. त्यातून मतदार संघातील गरजू रुग्णांना, शालेय विद्यार्थ्यांना अगर अडचणीत सापडलेल्या नागरिकाला वस्तू अगर आर्थिक रूपाने आपण सहकार्य करत असतो. शतक महोत्सवावेळी आपण विरोधी गटाचे गटनेते होतो, यामुळे नगराध्यक्षांनीही कोणत्याही प्रकारचे आर्थिक मदत करण्याचे आवाहन केलेले नसल्याने आपण महोत्सवासाठी पैसे घेतले नाहीत. मात्र आचरेकर आणि त्यांच्या टिमने मागणी करूनही पैसे दिले नाहीत म्हणून नाट्यगृहाच्या परिसरातील बिअरशॉपी, भरड येथील एका व्यापाऱ्याचे घर, आरक्षणातील जागा विकसीत करण्याचा विषयातील बिल्डर यांना कशाप्रकारे बेकायदेशीर त्रास देण्याच्या उद्देशाने पालिकेत थयथयाट करणारे आचरेकर आम्ही पाहिलेले आहेत, असेही श्री. केणी यांनी सांगितले.

गटार आणि व्हाळ्या यापुढे आचरेकरांचा विकास नाही

शहरात दर्जेदार पारदर्शक विकास कामे शहरात सध्या आमदार वैभव नाईक यांनी उपलब्ध करून दिलेल्या कोट्यावधी रूपयांतून दर्जेदार विकासकामे सुरू आहेत. माझ्या प्रभागातील रस्ते जावून आचरेकरांनी पहावे, आता पुढील टप्पा पर्यटन विकासाच्यादृष्टीने असणार आहे. आचरेकर यांनी फक्त गटार आणि व्हाळ्या यापुढे जावून कधीही विचार केलेलाच नाही, असाही टोला श्री. केणी यांनी मारला आहे. हॉटेल सायबाच्या समोर सुरू असलेल्या विकासकामाचा पहिला टप्पा हा २५ लाख रूपयांचा आहे, आणि सदरचे काम दर्जेदार पद्धतीनेच करण्यात आलेले आहे. आचरेकरांच्या कारकिर्दीत सर्वच टेंडर ही जास्त दराने होत होती. ही रक्कम कोणाच्या घशात जात होती, हे सर्व जनतेला माहिती आहे. कोणत्याही प्रकारचा उद्योगधंदा आचरेकर यांचा नसतानाही आजही ते राजेशाही पद्धतीने जगत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, असाही उपरोधिक टोला श्री. केणी यांनी मारला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!