येवकच व्हया, मालवण आपलाच आसा : माजी नगराध्यक्षांकडून शहरवासीयांना निमंत्रण
स्वतःच्या घरचा महोत्सव असल्याचे समजून मालवण वासियांनी पर्यटन महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण नगरपरिषदेच्या वतीने १३ ते १५ मे रोजी “जल्लोष २०२२” हा पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव आपल्या घरचा महोत्सव असल्याचे समजून प्रत्येक मालवणवासियाने या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे. मालवण नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षी असा महोत्सव आयोजित करण्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली होती, मात्र कोरोना महामारीमुळे या दोन वर्षात महोत्सव आयोजित करता आला नाही. मात्र आमदार वैभव नाईक यांनी पुढाकार घेऊन हा नगरपालिकेच्या वतीने आणि जिल्हा नियोजनच्या माध्यमातून हा महोत्सव आयोजित केला आहे, असे श्री. कांदळगावकर यांनी म्हटले आहे.
या संदर्भात श्री. कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून आपली भूमिका मांडली आहे. मालवण मध्ये दांडी बीच येथे १३ ते १५ मे रोजी पर्यटन महोत्सव मालवण नगरपरिषदे तर्फे आयोजित केला आहे. तरी मालवण वासीयांनि हा महोत्सव आपल्या घरातील आहे असून यामध्ये स्वतःहुन सहभाग घेऊन हा महोत्सव यशस्वी करावा असे नम्र आवाहन करत आहे. आमच्या कालावधीत दरवर्षी अश्या प्रकारे पर्यटन महोत्सव करण्याचा मानस होता. तशी तरतूदही न. प. अर्थसंकल्पात दरवर्षी करण्यात आली होती. परंतु शतक महोत्सवाच्या कार्यक्रमा नंतर २ वर्ष कोरोना महामारीमुळे अश्या प्रकारे महोत्सव साजरा करता आला नव्हता. यावर्षी आमचा कालावधी संपला आहे आणि न. प. वर प्रशासक नेमला गेला आहे. असे असले तरी आमचे आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली न. प. तर्फे जिल्हा नियोजनच्या माध्यमातून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
मालवण हे पर्यटन दृष्ट्या विकसित होणारे शहर आहे. आणि दरवर्षी पर्यटकाचा ओघ वाढतच आहे. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अश्या प्रकारचा पर्यटन महोत्सव घेण्याचा मुख्य उद्देश आहे. जेणे करून पर्यटन वृद्धी बरोबर मालवण मध्ये व्यवसाय वृद्धी पण होणारी आहे. त्याच प्रमाणे मालवण वासीयांना सुद्धा करमणुकीचे साधन उपलब्ध करून देणे हा त्या मागचा उद्देश आहे. या पर्यटन महोत्सवा निमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यात सहभाग घेऊन या स्पर्धा यशस्वी कराव्यात तसेच करमणुकीच्या कार्यक्रमाचाही आस्वाद घ्यावा अशी नम्र विनंती करण्यात येत आहे. या पर्यटन महोत्सवा निमित्त १० मे रोजी सायंकाळी ५ वाजता भरड दत्त मंदिर ते नगरपालिका अशी शोभायात्रा आयोजित केली आहे. तरी सर्व मालवण वासीयांनी यामध्ये सहभागी होऊन पर्यटन वाढी बाबत मालवण वासीयांची एकजूट दाखवून दयावी. दांडी येथे हा पर्यटन महोत्सव आयोजित केल्यानंतर तेथील स्थानिक लोकांनी हा पर्यटन महोत्सव यशस्वी करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याबद्दल यानिमित्त त्यांचे आभार मानत आहे, असे सांगून “येवकच होया, मालवण आपला आसा” अशी साद माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी घातली आहे.