आमदार निलेश राणेंच्या नेतृत्वात कुडाळ – मालवणच्या सर्वांगीण विकासाला मिळणार चालना !
भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस संग्राम साळसकर यांचा विश्वास
मालवण | कुणाल मांजरेकर
कुडाळ मालवण विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी ऐतिहासिक विजय मिळवला.आहे. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात कुडाळ मालवण मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून मालवण मधील पर्यटनवाढ, उद्योजकता विकास आणि तरुणांच्या रोजगारासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असा विश्वास युवा उद्योजक तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस संग्राम साळसकर यांनी व्यक्त केला आहे.
निलेश राणे हे राज्यस्तरावर काम करणारे एक अभ्यासू नेते आहेत. यापूर्वी त्यांनी पाच वर्षे येथील लोकसभा मतदार संघात खासदार म्हणून काम केले असून त्यांच्या नावाभोवती असलेल्या वलयाचा आणि त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्वाचा निश्चितपणे कुडाळ मालवणच्या विकासाला फायदा होणार आहे. मागील दहा वर्षे हा मतदार संघ विकासपासून मागे गेला होता. येथील पर्यटन, उद्योगाचे प्रकल्प रखडले होते. मात्र आता निश्चितच निलेश राणे यांच्या नेतृत्वात या प्रकल्पांना गती येणार आहे. त्यामुळे तरुणाना रोजगार उपलब्ध होईल. कुडाळ एमआयडीसी आज मरणासन्न अवस्थेत आली आहे. त्याला उर्जितावस्था येण्यासाठी प्रयत्न होतील. तसेच मालवण मधील युवा मच्छिमार व्यावसायिक यांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यात त्यांच्या व्यवसायात वाढ होण्यासाठी प्रयत्न केले जातील. मालवण कुडाळ मधील विकास साधायचा असेल तर पर्यटनाच्या माध्यमातून गोव्याप्रमाणे येथील आर्थिक प्रगती करण्यावर निलेश राणे यांचा निश्चितपणे लक्ष राहणार आहे. या निवडणुकीत युवा वर्गाने निलेश राणे यांना उत्स्फूर्त साथ दिली आहे. युवकांच्या मनातील आत्मविश्वास या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यामुळे युवकांच्या कल्याणासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जातील. येथील शिक्षणाचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच आरोग्यवस्था अधिक सुरळीत करण्यासाठी देखील प्रयत्न होण्याचा विश्वास संग्राम साळसकर यांनी व्यक्त केला आहे.