भंडारी हायस्कुलच्या माजी मुख्याध्यापिका सौ. सुप्रिया टिकम यांचे निधन 

मालवण (प्रतिनिधी) येथील भंडारी ए. सो. हायस्कुलच्या माजी मुख्याध्यापिका आणि कलमठ ता. कणकवली येथील रहिवासी सौ. सुप्रिया श्रीराम टिकम (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे शनिवारी निधन झाले. रविवारी कलमठ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले 

मालवण येथील भंडारी हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका  सौ. सुप्रिया टिकम म्हणजेच मालवण सर्जेकोट येथील पूर्वाश्रमीच्या सुनेत्रा यशवंत कोळंबकर यांचे इयता सातवी पर्यंतचे शिक्षण सर्जेकोट शाळेत झाल्यावर आठवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण मालवणच्या टोपीवाला हायस्कुलमध्ये झाले होते. मालवणच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात बीए पर्यंतचे शिक्षण घेऊन त्यानंतर त्यांनी बीएड पदवी प्राप्त केली. १९८९ साली त्या वडाचापाट येथील श्री शांतादुर्गा हायस्कुलमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर ऑगस्ट २०१६ मध्ये त्या मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पर्यवेक्षक म्हणून रुजू झाल्या नंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये त्या भंडारी हायस्कुलच्या मुख्याध्यापिका बनल्या. मार्च २०२० मध्ये त्या मुख्याध्यापिका म्हणून शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाल्या. हसतमुख, मनमिळावू स्वभावाच्या व विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्या परिचित होत्या. अल्पशा आजाराने गेले काही महिने त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरु होते. मात्र शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. कृषी खात्यातील श्रीराम टिकम यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगी असा परिवार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3844

Leave a Reply

error: Content is protected !!