वायरी भूतनाथ गावात प्रशस्त सभागृहासाठी निधी देणार ; नाट्यकलेची होणार उपासना
खा. विनायक राऊत यांची ग्वाही ; वायरीत भजनसम्राट भालचंद्र केळुसकर यांच्यासह १३० कलाकारांचा सत्कार
वायरी भूतनाथ ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन ; भालचंद्र बुवांचे स्थान अखंड तपश्चर्येतून निर्माण झालंय : खा. राऊत यांचे गौरवोद्गार
कुणाल मांजरेकर
मालवण : वायरी भूतनाथ गावचे सुपुत्र, सिंधुरत्न संगीतरत्न पुरस्कार प्राप्त कोकण भजन सम्राट बुवा भालचंद्र केळुसकर यांना “कलागौरव पुरस्कार” देऊन मंगळवारी रात्री खा. विनायक राऊत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी भजन आणि नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गावातील तब्बल १३० कलाकारांचाही खा. राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वायरी भूतनाथ गावाने एकत्र येऊन साजऱ्या केलेल्या या दिमाखदार सत्कार सोहळ्याचे खा. विनायक राऊत यांनी कौतुक करतानाच भगवंतांच्या कृपेने तुम्हाला जे कलेचं वैभव मिळाले आहे, त्याचे जतन करून ठेवण्यासाठी, या कलेची उपासना करण्यासाठी वायरी भूतनाथ गावात सभागृह उभारण्या करिता निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही खा. राऊत यांनी यावेळी दिली. यावेळी भालचंद्र केळुसकर यांच्या भजन क्षेत्रातील योगदानाचे दे त्यांनी कौतुक केले.
वायरी भूतनाथ ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी रात्री भूतनाथ मंदिराच्या प्रांगणात भजन सम्राट बुवा भालचंद्र केळुसकर यांचा कला गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाट्यकर्मी रामचंद्र मयेकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, किसन मांजरेकर, प्रा. रविंद्र वराडकर, भगवान लुडबे, प्रदीप वेंगुर्लेकर, दादा झाड, नंदकुमार झाड, शिला लुडबे, संगीता चव्हाण, बाबी चव्हाण, रामदास मयेकर, एस. पी. चव्हाण, श्री. कुर्ले, रावजी लुडबे, संतोष लुडबे, प्रसाद चव्हाण, विरेश देऊलकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी खा. विनायक राऊत म्हणाले, वायरी भूतनाथ गावाने एकत्र येऊन हा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. गावात आज तब्बल १३० जणांचा सत्कार करण्यात आला. हे वैभव केवळ वायरी भूतनाथ गावचे नाही तर जिल्ह्याचं हे वैभव आहे. बऱ्याच गावात काखेत कळसा आणि गावाला वळसा मारायची सवय असते. आपल्या बाजूचा किती मोठा झाला, त्यापेक्षा कसा मोठा झाला, हे बघायची अनेकांना सवय असते. मात्र वायरी भूतनाथ गावाने भालचंद्र केळुसकर यांच्यासारखे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ भजन सम्राट आपल्या गावात आहेत, याची जाणीव ठेवून आणि एकत्र येऊन केळुसकर बुवांसह गावातील कलाकारांचा सत्कार केला, हा मोठेपणा दाखवल्याबद्दल वायरी भूतनाथ ग्रामस्थांचे आपण अभिनंदन करतो, असे ते म्हणाले.
भालचंद्र केळुसकर यांचे कौतुक करताना एवढं मोठं कर्तृत्व या कला क्षेत्रात निर्माण करीत असताना सप्तसुरांचे सेवेकरी होणं आणि सप्तसुरांना हृदयात साठवून ठेवून त्यांची उपासना करण्यासाठी मेहनत करावी लागते, तपश्चर्या करावी लागते. आज भालचंद्र बुवांचे स्थान त्या तपश्चर्येतून निर्माण झालं आहे. ही तपश्चर्या करत असताना त्या कलेचं त्यांनी पावित्र्य राखलं आहे. कलेला बाजारू स्वरूप येऊ दिलेलं नाही. आता भजन कलेत खुप बदल होत आहेत. पारंपरिक बाऱ्या कुठे ठेवल्या तर त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही, पण ट्वेन्टी ट्वेन्टी बाऱ्यांकडे लोक आकर्षित होतात. ट्वेन्टी ट्वेन्टी मध्ये सरस्वतीला स्मरण करण्यापूर्वी समोरील बुवाला टोमणे मारण्याला सुरुवात होते. हे प्रकार अतिशय चुकीचे आहेत. भजन कलेतून जनतेचे प्रबोधन करण्याची आपली जबाबदारी असते. त्याचा विसर पडायला देता नये. तुमच्याकडे केवळ पैसा असून चालणार नाही. जीवनात समाधान आणि आनंद केवळ आणि केवळ भजनातून मिळू शकतो, असे सांगून भगवंतांला साध्य करण्याचं एकमेव साधन म्हणजे भजन होय. त्या भजनातूनच परमेश्वराची प्राप्ती करायची आणि आपलं जीवन सुखी समृद्धी करण्याचं प्रयत्न आपण केला तर आपल्याला काही कमी पडत नाही. संतांनी सुध्दा भगवंतांच्या हरिनामाला अमृतापेक्षा अधिक महत्व दिले आहे. सुदैवाने हे सर्वच संत आपल्या महाराष्ट्राला लाभले आहेत. त्याच संत परंपरेने घालून दिलेली भजनी परंपरा आज पुढे नेण्याचे काम तेवढ्याच पावित्र्यातून केळुसकर बुवांसारखे भजनातील तपस्वी भीष्माचार्य स्वतः करत आहेत. आणि त्यांच्या शिष्यांच्या माध्यमातून करत आहेत.
आज १३० जणांचे सत्कार वायरी भूतनाथ ग्रामस्थांनी देव भूतनाथाच्या साक्षीने केले आहेत. जे या भगवंतांच्या कृपेने तुम्हाला मिळाले आहे, त्याचा साठा करून ठेवण्यासाठी, त्याचे कायमस्वरूपी जतन करण्यासाठी वायरी भूतनाथ गावात कलेचे संशोधन करण्यासाठी, कलेची उपासना करण्यासाठी एखादे सभागृह अथवा वास्तू उभी करायची गरज असेल तर माझा आणि आमदार वैभव नाईक यांचा निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही खा. विनायक राऊत यांनी दिली.
गावात झालेला सन्मान अभिमानाची बाब ; मनोगत व्यक्त करताना भालचंद्रबुवा गहिवरले
आतापर्यंत अनेकांनी माझ्या कार्याची दखल घेऊन मला पुरस्कार दिले. पण आज माझ्या गावात सत्कार झाला, तो मान- सन्मान माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मी आजवर करीत असलेल्या भजनाच्या सेवेची आज मला पोचपावती मिळाली आहे, असे सांगून हा सत्कार बघायला माझी सौभाग्यवती असती तर अधिक समाधान असते. बऱ्याच सत्कार सोहळ्याला ती असायची, असे सांगताना भालचंद्र केळुसकर यांना गहिवरून आले. वायरी भूतनाथ ग्रामस्थांनी आज गावातील सगळ्या कलाकारांचा सत्कार केला आहे, अशा प्रकारचा भव्य दिव्य सत्कार हा राज्यातील पहिलाच कार्यक्रम असल्याचे सांगून या कार्यक्रमाला प्रत्येक ग्रामस्थाने मदत केली आहे. याचे सर्व श्रेय गावाला आहे, असे ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नाट्यकर्मी रामदास मयेकर, सुधीर कुर्ले यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर याने केले तर प्रा. रवींद्र वराडकर यांनी आभार मानले.