राज ठाकरेंवर दंगल घडवण्याचा आरोप करणाऱ्या विनायक राऊतांनी इतिहासाची आठवण ठेवावी
मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांची प्रतिक्रिया ; खा. राऊतांना बाळासाहेबांच्या भाषणाच्या क्लिप पाठवणार
कुणाल मांजरेकर
मालवण : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनीच मशिदींवरचे भोंगे काढलेच पाहिजेत हे भरसभेत सांगितले होते. तसेच सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणास विरोध करत तिथे महाआरत्यांचे आयोजन केले. त्यावेळी दंगल होणार नव्हती का ? असा सवाल मनसेच्या वतीने अमित इब्रामपूरकर यांनी केला आहे. राजसाहेबांवर सुपारी घेऊन दंगल घडवण्याचा आरोप करणाऱ्या खा.विनायक राऊत यांनी इतिहासाची आठवण ठेवावी. सत्तेत राहून भ्रमिष्ठ झालेले असाल तर त्यावेळच्या बाळासाहेबांच्या भाषणाच्या क्लिप्स आमच्याकडे आहेत. ते तुम्हाला आम्ही पाठवून देवू, असेही त्यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे हे महाराष्ट्रात दंगली घडवण्याची सुपारी घेत असल्याच्या खासदार विनायक राऊत यांच्या टिकेचा मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे खरपूस समाचार घेतला. बाळासाहेबांनी हिंदुंच्या रक्षणासाठी, व्यापक हिंदुत्वाचा नारा देत शिवसेना पक्ष वाढवला, याची आठवण खासदार विनायक राऊत यांनी ठेवावी, असे सांगून सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेने हिंदुत्व बाजुला ठेवलं आणि राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी युती केली. हे शिवसेनेचे बेगडी हिंदुत्व आहे हे तुम्हाला मान्य करावेच लागेल. राजसाहेबांनी हिंदुत्व आणि मराठी अस्मिता यासाठी मनसे पक्षाची स्थापना केली. हे लक्षात ठेवा. साहेबांकडूनच राजसाहेबांनी हिंदुरक्षणासाठी ‘बाळकडू’ घेतलं. हिंदुह्दयसम्राट ही बाळासाहेबांची नावासमोरची उपाधी राजसाहेबांनी स्वतः घेतली नाही. आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार पुढे घेउन जाण्याचा प्रयत्न राजसाहेब करत आहेत, असेही अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.