अभिनेते भरत जाधवांची सूचना ; आ. वैभव नाईकांकडून तात्काळ दखल !
कुडाळ : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून कुडाळ येथे कै. मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह उभारले जात आहे. मराठी सिने- नाट्य अभिनेते भरत जाधव यांनी याठिकाणी भेट देऊन नाट्यगृहाची पाहणी केल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून नाट्यगृहाच्या रंगमंचातील त्रुटी व्हिडीओ प्रसारित करत समोर आणल्या होत्या. या व्हिडीओची आ. नाईक यांनी तात्काळ दखल घेतली आहे. आ. नाईक यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व आर्किटेक्ट यांच्यासमवेत आज नाट्यगृह व भंगसाळ नदीची पाहणी केली. याप्रसंगी कै. मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाचा रंगमंच २४ फुटावरून ३० फूटापर्यंत वाढविण्याची सूचना केली आहे. त्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले.
आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून कुडाळमध्ये मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह साकारत आहे. या नाट्यगृहाला सिने- नाट्यअभिनेते भरत जाधव यांनी भेट दिल्यानंतर रंगमंचातील त्रुटी पाहून नाराजी व्यक्त केली होती. याबाबत भरत जाधव यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून हा रंगमंच अतिशय छोटा असल्याने या ठिकाणी नाटके लावताना अडचण निर्माण होणार असल्याचे स्पष्ट केले होते. या व्हिडीओची आ. नाईक यांनी दखल घेतली आहे. या नाट्यगृहाच्या इंटिरिअर प्लॅन बाबत भरत जाधव यांसह जेष्ठ नाट्यकर्मींच्या सूचना लक्षात घेऊन नवीन प्लॅन बनविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत कुडाळ भंगसाळ नदी येथे पर्यटन स्थळ विकसित करण्यात येणार असून त्याची पाहणी देखील यावेळी करण्यात आली. लवकरात लवकर हे काम सुरु करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी आवश्यक सूचना अधिकाऱ्यांना केल्या. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, उपविभागीय अधिकारी राजन चव्हाण, शाखा अभियंता प्रदीप पाटील, अमोल बिराडे, नाट्यगृहाचे आर्किटेक्ट अमोल कामत उपस्थित होते.