तळगाव बैल झुंज प्रकरणात आणखी तिघांना अटक ; आरोपींची संख्या १५ वर
मालवण न्यायालयाकडून जामीन मंजूर ; संशयित आरोपींतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई यांचा युक्तिवाद
मालवण : तळगाव येथील अनधिकृत बैल झुंज प्रकरणात पोलिसांच्या तपासात आणखी तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. यामध्ये सद्गुरु काशिनाथ दळवी (रा. होडावडे, ता.कुडाळ), महादेव विलास पावसकर (रा. नेरूर ता.कुडाळ) आणि आनंद दिवाकर नेरूरकर (रा. नेरुर ता.कुडाळ) यांचा समावेश आहे. या तिन्ही जणांना पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांच्या समोर हजर केले असता त्यांची प्रत्येकी ७५०० रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली. आरोपींतर्फे ॲड.स्वरुप नारायण पई यानी काम पाहिले.
तळगाव येथे २९ मार्च रोजी झालेल्या अनधिकृत बैल झुंज दरम्यान जखमी झालेल्या वेंगुर्ले येथील एका बैलाचा मृत्यू झाला. यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात या घटनेचे पडसाद उमटले. प्राणीमित्र संस्थेच्या माध्यमातून दाखल तक्रारीनंतर मालवण पोलीस ठाण्यात १२ संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या सर्वांच्या अटकेची व जामिनाची कार्यवाही पूर्ण झाली होती. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांच्या तपासात या गुन्ह्यात आणखी तिघांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.