आदित्य ठाकरेंचा सिंधुदुर्ग दौरा ठरला “फलदायी” ; वैभव नाईकांना वाढदिवसानिमित्त विकास कामांची भेट
कोकण दौरा संपताच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २३.१२ कोटींचा निधी ; सर्वाधिक निधी कुडाळ, मालवणात
कुणाल मांजरेकर
मालवण : राज्याचे पर्यटन आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. हा दौरा फलदायी ठरला आहे. कोकण दौरा संपताच प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आदित्य ठाकरेंनी २३ कोटी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातील सर्वाधिक निधी आ. वैभव नाईक यांच्या कुडाळ, मालवण मतदार संघात देण्यात आला असून यानिमित्ताने आदित्य ठाकरेंनी वैभव नाईकांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली आहे.
कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. दरम्यान त्यांनी जिल्हा दौरा करत अनेक ठिकाणी भेट देऊन आढावा घेतला. वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे आयोजित केलेला शिमगोत्सव व त्याला लाभलेला प्रतिसाद पाहून ते भारावून गेले. त्याचबरोबर मालवण बंदर जेटीची पाहणी करताना सिंधुदुर्ग किल्ला येथे पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेऊन त्यांनी तातडीने शासन निर्णय काढत प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२१ -२२ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक विकास कामांसाठी २३ कोटी १२ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवणवासीयांना ना.आदित्य ठाकरे यांनी विकास कामांची ही एक प्रकारे भेटच दिली आहे.
यामध्ये कुडाळ कलेश्वर मंदिर नेरुर येथे संपूर्ण आवारामध्ये डांबरीकरण करणे, आवारात भक्त निवास बांधणे, आवारामध्ये सभामंडप बांधणे, संरक्षक भिंत व सुशोभिकरण निधी ३ कोटी, कुडाळ भंगसाळ नदी येथे पर्यटन स्थळ विकसित करणे निधी ५ कोटी, मालवण तारकर्ली येथे शासकीय जागेत उद्यान विकसित करणे निधी ३ कोटी, मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला येथे एल.ई.डी. लाईट शो बसवून सुशोभिकरण करणे निधी ४ कोटी ७५ लाख, मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला येथे एल.ई.डी. लाईट शो बसवून सुशोभिकरण करणे (विद्युत पुरवठा करणे, जनित्र, रोहित्र उभारणी करणे) २ कोटी ३७ लाख, देवगड तालुक्यातील मिठबाव तांबळडेग येथील गजबादेवी मंदिर पर्यटन क्षेत्रात सुविधा उपलब्ध करणे निधी ५ कोटी असे एकूण २३ कोटी १२ लाख निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी मंजूर करण्यात आला आहे.
खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून आमदार वैभव नाईक यांनी ना.आदित्य ठाकरे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. सर्वांच्या प्रयत्नांतून हा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी देत ना.आदित्य ठाकरे यांचे आभार मानले आहेत.