… तर राष्ट्रवादी काँग्रेसही स्वबळावर लढण्यास सक्षम !
आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा इशारा
सिंधुदुर्गात येणारा निधी शासकीय, कुठल्याही पक्षाची मक्तेदारी नाही
कुणाल मांजरेकर
मालवण : आगामी काळात होणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याच्या सूचना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसला वरिष्ठांकडून प्राप्त झाल्या आहेत. मात्र प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आगामी निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जागावाटपात सन्मानजनक जागा मिळाव्यात, अन्यथा स्वबळावर लढण्यास आम्ही तयार आहोत, अशी रोखठोक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी मांडली आहे. आपली लढाई कुठल्या व्यक्ती आणि कुठल्या शक्तीशी आहे, हे आम्हाला चांगलेच माहित आहे. पण ही जबाबदारी आमच्या बरोबरच शिवसेनेची सुद्धा असल्याची आठवण त्यांनी करून दिली. सिंधुदुर्गात प्रत्यक्ष निवडणुका जाहीर झाल्यानंतर कुठल्या पक्षाची कुठे ताकद आहे, त्याचा आढावा घेऊन सन्मानजनक जागावाटप व्हावे. हे जागावाटप स्थानिक कार्यकर्त्यांना मान्य नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर या निवडणुका लढवेल, यासाठीची तयारी आम्ही सुरू केली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
मालवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक येथील चिवला बीच हॉटेलमध्ये जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन सचिव काका कुडाळकर, बाळ कनयाळकर, तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, शहराध्यक्ष सतीश आचरेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अमित सामंत म्हणाले, लवकरच नगरपालिका निवडणूका जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुका सहा महिने पुढे गेल्या असल्या तरीही सर्व शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने आपली तयारी सुरू केली आहे. मालवण नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने शहर अध्यक्ष म्हणून युवा सामाजिक कार्यकर्ते सतीश आचरेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून यापूर्वी शहराध्यक्ष पदावर असलेल्या आगोस्तीन डिसोजा यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अखिल भारतीय अल्पसंख्यांक सेलच्या सिंधुदुर्ग कमिटीवर नेमणूक करण्याची शिफारस करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्याप्रकारे कामे होत आहेत, त्याने आकर्षित होऊन आज अनेक लोक पक्षात प्रवेश करत आहेत. आगामी काळात ग्रामीण भागातही काही ग्रामपंचायत सरपंच, सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे ते म्हणाले.
सिंधुदुर्गात २० हजार क्रियाशील सभासद नोंदणी करणार
राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष सदस्य नोंदणी सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आम्हाला १० हजार क्रियाशील सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु जिल्ह्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त काम केल्याने तब्बल २० हजार क्रियाशील सदस्य सिंधुदुर्गातून नोंदणी केले जातील या दृष्टीने आमची वाटचाल सुरू असल्याचे अमित सामंत यांनी सांगितले
सिंधुदुर्गात येणारा निधी शासकीय, कुठल्याही पक्षाची मक्तेदारी नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी येत आहे. मात्र हा निधी शासकीय आहे, कुठल्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही. चुकलेल्या कामांची जबाबदारी जशी सर्वांची आहे, त्याप्रमाणेच विकास कामांचे श्रेय देखील कोणा एका पक्षाचे नसून तिन्ही पक्षांचे सामायिक यश आहे, असे अमित सामंत म्हणाले.
प्रत्येक पं. स. मतदार संघात राष्ट्रवादीचे मेळावे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आगामी काळात प्रत्येक मतदार संघात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील. पावसाळ्यापर्यंत प्रत्येक पंचायत समिती मतदार संघात पक्षाचा मेळावा घेतला जाणार आहे. मालवणात आरोग्य विषयक समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे लवकरच मालवणच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याचप्रमाणे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील नजीकच्या काळात सिंधुदुर्गात येतील, असे अमित सामंत म्हणाले.