निलेश राणे चषक २०२२ : रोहित स्पोर्ट्स वेंगुर्लाची उपांत्य फेरीत धडक
भाजप नेते निलेश राणेंनी स्पर्धेला भेट देऊन दिल्या शुभेच्छा ; मैदानावर केक कापून वाढदिवस साजरा
मालवण : बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डींग मैदानावर आयोजित “निलेश राणे चषक” या राष्ट्रीय स्तरावरील खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या सामन्यांमधून रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी उशिरा माजी खासदार निलेश राणे यांनी स्पर्धेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी निलेश राणेंचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
गुरुवारी दुसऱ्या दिवशी झालेल्या सामन्यांमध्ये चिपळूण इलेव्हन विरुद्ध रोहित स्पोर्ट्स यांच्यातील पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चिपळूण संघ ३५ धावात ऑलआउट झाला. ३६ धावांचे आव्हान रोहित स्पोर्ट्स संघाने पार करत विजय मिळविला. वेंगुर्ला तर्फे हॅट्ट्रिकसह ४ विकेट घेतले. दुसऱ्या सामन्यात अलमदार कुडाळ संघाने पोलीस बॉईज मालवण संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ७ बाद ४६ धावा केल्या. पोलीस संघातर्फे तुषार धामापूरकर याने हॅट्ट्रिक सह ४ विकेट घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना पोलीस बॉईज मालवण संघाने ३ बाद ५१ धावा करत विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात एनसीसी कातळी संघाने कट्टा बाजारपेठ संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ३ बाद ७९ धावा केल्या. मात्र कट्टा बाजारपेठ संघ ४ बाद २८ धावा करू शकल्याने कातळी संघ विजयी झाला. चौथ्या सामन्यात आरवी कोरगाव गोवा संघाने सागरकिनारा दांडी संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ५२ धावा केल्या. दांडी संघ ८ बाद ४३ धावाच करू शकल्याने गोवा संघ विजयी झाला. गोवा संघातर्फे गौरेश नागवेकर याने हॅट्ट्रिकसह ५ विकेट घेतले.
यानंतर झालेल्या दुसऱ्या फेरीत पहिल्या सामन्यात पोलीस बॉईज मालवण संघाने रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ३८ धावा केल्या. हे आव्हान वेंगुर्ला संघाने बिनबाद ४४ धावा करत सहजपणे गाठत विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एनसीसी कातळी संघाने ७ बाद ३६ धावा केल्या. हे आव्हान गाठताना आरवी कोरगाव गोवा संघाने १ बाद ३९ धावा करत विजय मिळवला. यानंतर आरवी कोरेगाव गोवा विरुद्ध रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला या संघांमध्ये उपांत्यपूर्व सामना झाला. यात प्रथम फलंदाजी करताना गोवा संघाने ७ बाद ३९ धावा केल्या. हे आव्हान वेंगुर्ला संघाने ४ गड्यांच्या मोबदल्यात पार करत विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
या सामान्यांचे गुणलेखन गणेश कृष्णा राऊळ, पायस आल्मेडा यांनी केले. पंच म्हणून उमेश मांजरेकर, मंगेश धुरी, ऍम्ब्रोज आल्मेडा, दीपक धुरी यांनी काम पाहिले. समालोचन श्याम वाक्कर, प्रदीप देऊलकर, राजा सामंत यांनी केले.