तीन वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलाला “आभाळमाया” कडून मदतीचा हात
कुणाल मांजरेकर
मालवण : कणकवली तालुक्यातील आशिये – गुरववाडी येथील कु. दियान शेखर गुरव या तीन वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलाला “आभाळमाया” ग्रुपने मदतीचा हात दिला आहे.
कु. दियान गुरव हा छोटा मुलगा कॅन्सर सारख्या आजाराने त्रस्त आहे. त्याच्यावर मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. त्याच्या घरातील आर्थिक उत्पन्न जेमतेम असून कुटुंबाची परिस्थिती हालाकीची आहे. तरी देखील त्यांच्या कुटुंबाने याही परिस्थितीशी झुंज देत दियान वरील उपचार सुरू ठेवले आहेत. ही बाब “आभाळमाया” ग्रुपचे सदस्य शुभम मसुरेकर यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ग्रुप सदस्यांजवळ मदतीसाठी आवाहन केले असता ३७,५०० रुपयांची मदत जमा झाली. ही मदत दियानच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी ग्रुप सदस्य समीर रावले, शुभम मसुरेकर, ऍड. प्रदीप मिठबावकर, जगदीश परब, डॉ. प्रथमेश वालावलकर आदी उपस्थित होते.