मनसेच्या वतीने २१ मार्च रोजी किल्ले सिंधुदुर्गवर शिवजन्मोत्सव सोहळा

ढोल ताशांच्या गजरात भव्य मोटरसायकल रॅलीने साजरी होणार शिवजयंती

मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या हस्ते शिवराजेश्वर मंदिरात महाराजांना अभिवादन

कुणाल मांजरेकर

मालवण : मनसेच्या वतीने तिथीप्रमाणे येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यात शिवजन्मोत्सव म्हणून साजरी करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील मोठ्या जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात आणि भव्य मोटरसायकल रॕलीने शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे. मनसे नेते परशुराम उपरकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत.

सोमवारी २१ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता भरडनाका मालवण येथून मालवणातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोटरसायकल रॕलीने पिंगुळी येथे मार्गस्थ होणार आहेत. त्यानंतर पिंगुळी कुडाळ येथून या रॅलीला सुरुवात होणार असून त्यानंतर कुडाळ शहर, ओरोस येथे महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग येथे ही रॅली येणार आहे. सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, ओरोस येथील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या रॅलीत ठिकठिकाणी सहभागी होणार आहेत. रॅलीचे मालवणात आगमन झाल्यानंतर किल्ले सिंधुदुर्ग वरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील एकमेव असलेल्या शिवराजेश्वर मंदिरातील शिवप्रतिमेस मनसे नेते परशुराम उपरकर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. तरी सर्व शिवप्रेमी, नागरीक आणि मनसैनिकांनी या शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेचे मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव व तालुका सचिव विल्सन गिरकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!