आ. वैभव नाईकांच्या वाढदिवसानिमित्त ३०० रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया !
पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची उपस्थिती
२६ मार्चला पूर्व तपासणीचा मालवण ग्रामीण रुग्णालयात शुभारंभ
८, ९ व १० एप्रिल रोजी होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
मालवण : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. आ. नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. २६ मार्च पासून मोतीबिंदू पूर्व तपासणी होणार असून याचा शुभारंभ मालवण ग्रामीण रुग्णालय येथे होणार आहे.
डॉ. तात्याराव लहाने, जे. जे. हॉस्पिटल मुंबईच्या नेत्र शल्य चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. राघिनी पारेख यांच्यासह इतर १५ तज्ज्ञ डॉक्टरांकडून ३०० रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज ओरोस येथे ८, ९ व १० एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.
प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ असलेले डॉ. तात्याराव लहाने यांनी आतापर्यंत ५८७ शिबिरांमध्ये दीड लाखाहून अधिक मोतीबिंदू व डोळ्यांसंबंधित शस्त्रक्रिया केल्या आहे. आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत होत असलेला सिंधुदुर्गातील हा पहिला कॅम्प आहे. प्राथमिक तपासणी मध्ये ज्यांना मोतीबिंदू आढळेल त्यांच्यावर मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे त्याचबरोबरच रुग्णांना लागणारी लेन्स व दोन प्रकारचे चष्मे मोफत दिले जाणार आहेत.
इथे होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्व तपासणी…
शनिवार २६ मार्च रोजी मालवण ग्रामीण रुग्णालय, सोमवार २८ मार्च आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र, बुधवार ३० मार्च मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्र, गुरुवार ३१ मार्च हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्र, शुक्रवार १ एप्रिल वालावल प्राथमिक आरोग्य केंद्र.
सोमवार ४ एप्रिल पणदूर व कडावल प्राथमिक आरोग्य केंद्र.
बुधवार ६ एप्रिल माणगांव व हिर्लोक प्राथमिक आरोग्य केंद्र,
गुरुवार ७ एप्रिल नेरूर प्राथमिक आरोग्य केद्र याठिकाणी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्व तपासणी होणार असून कुडाळ मालवण तालुक्यातील जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. तात्याराव लहाने यांनी केले आहे.
या शिबिरा संदर्भात डॉ. तात्याराव लहाने यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज ओरोस येथे शुक्रवारी भेट देऊन या शिबिराच्या नियोजनाबाबत बैठक घेत चर्चा केली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवून देण्याचे आवाहन केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. एस. एस. मोरे यांच्यासमवेतही डॉ. तात्याराव लहाने यांची बैठक संपन्न झाली. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, जि. प. गटनेते नागेंद्र परब, डॉ जोशी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाट, अतुल बंगे, नागेश ओरोसकर, हेदूळ सरपंच नंदू गावडे, कुंदे सरपंच सचिन कदम, ओरोस सरपंच सौ मंगल देसाई, परशुराम परब, बंडू चव्हाण, राजेश गावकर, राजू गवंडे, रवी कदम आदींसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.