शिवसेनेत अन्य पक्षातून येणाऱ्यांसाठी पायघड्या ; निष्ठावंतांवर अन्याय !
आ. वैभव नाईकांवर निष्ठांवंत शिवसैनिक नाराज ; मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांचा आरोप
थोपवा थोपवी करण्यासाठी अर्थसंकल्पीय भाषण टाकून वैभव नाईक जिल्ह्यात पळाल्याचीही टीका
कुणाल मांजरेकर
मालवण : आमदार वैभव नाईक यांच्यावर निष्ठावंत शिवसैनिक नाराज आहेत. तसेच पर्ससीन विषयावरुनही शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सुर आहे. त्यामुळे हे नेते स्वत:च्या स्वार्थासाठी अन्य पक्षातील स्थानिक नेत्यांना सेनेत प्रवेश देत त्यांच्यासाठी पायघड्या घालत असल्याची टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. दरम्यान, आज विधिमंडळात अर्थसंकल्प मांडला जात असताना नाराज मंडळीना थोपवण्यासाठी आ. वैभव नाईक जिल्ह्यात दाखल झाले. नाराज मंडळीची थोपवा-थोपवी शनिवार, रविवारी दोन दिवस सुट्टीच्या दिवशी देखील करता आली असती. पण तसे न करता अर्थसंकल्प भाषणाकडे पाठ फिरवून आ. नाईकांना सिंधुदुर्गात पळावे लागते. यावरुन जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांवर किती कार्यक्षम आहेत, हे स्पष्ट होत असल्याचेही श्री. इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात आ. नाईक कोट्यावधींचा निधी आणला असे सांगतात तर दुसरीकडे विधानसभेत निधीची भांडण करतात. तरीही जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आणू शकत नाहीत ही वस्तुस्थिती मनसेने नेहमी मांडली आहे. तसेच याची पोलखोलही मनसे नेते परशुराम उपरकर यांनी केली. याही वेळेला जिल्हयासाठी भरीव आर्थिक तरतूद होणार नसल्याचा अंदाज आल्याने अर्थसंकल्प सादर करण्याच्या दिवशी आमदार सिंधुदुर्गात पळाले. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला आ. नाईक यांना वेळ नाही. विधिमंडळाच्या सभागृहात दरवर्षी मार्चमध्ये अर्थसंकल्प अधिवेशन होत असते. एप्रिल-मार्च या कालावधीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विविध प्रश्नांसाठी लागणाऱ्या निधीची तरतुद केली जाते. आमदारांना वाचण्यासाठी प्रत दिली जाते. त्यावर विधानसभा व विधानपरिषदेत चर्चा होऊन राज्यपालांच्या स्वाक्षरीने अंतिम मंजुरी दिली जाते. निधीची तरतुद झाल्याने प्रलंबित विषय मार्गी लागतात. परंतु जनतेच्या विषयाशी देणे-घेणे नाही अशा अविर्भावात आमदार वैभव नाईक अर्थसंकल्प सोडून जिल्ह्यात पळाले, अशी टीका अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.