घोषणा करण्याचं काम अनेकांनी केलं… पण दिलेला शब्द फक्त शिवसेनेनेच पाळला !

पावशी ग्रामपंचायत नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी खा. विनायक राऊत यांचा विरोधकांना टोला

७५ लाख रुपये खर्चून साकारलेल्या नूतन वास्तूचे खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्याहस्ते उदघाटन

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजवर अनेकांनी घोषणा करण्याचे काम केले. परंतु केलेल्या घोषणा पूर्ण करण्यास त्यांना जमले नाही. मात्र शिवसेनेने दिलेला प्रत्येक शब्द पाळला आहे. त्यामुळेच विमानतळ, शासकीय मेडिकल कॉलेज व जिल्ह्यातील इतर महत्वाचे प्रश्न मार्गी लागले, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी पावशी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.

खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनेतून ७५ लाख रुपये निधी खर्च करून पावशी ग्रामपंचायतची नूतन इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र, व्यायामशाळा या सुविधा सुरु करण्यात आल्या असून याचा उदघाटन सोहळा खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पार पडला. यावेळी फीत कापून नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी खा. विनायक राऊत म्हणाले, गावात ग्रामपंचायत वास्तू कशी असावी याचे चांगले उदाहरण म्हणजे पावशी ग्रामपंचायत इमारत आहे. ही वास्तू कशा पद्धतीने बांधली गेली आहे, ते सर्वांनी पाहावे, असे सांगत ग्रामपंचायतच्या नवीन बॉडीचे त्यांनी कौतुक केले. जिल्हा परिषदेत मनमानी कारभार सुरू असून त्याचाही पोलखोल माझे जि. प. सदस्य लवकरच करतील असेही ते म्हणाले.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, पावशी हे गाव कुडाळ शहराच्या अत्यंत जवळचे गाव आहे. गावाच्या विकासासाठी सर्वांनी योगदान दिले आहे. सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच दीपक आंगणे व ग्रा. प. सदस्य यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील सर्वात मोठी सुमारे ४ हजार स्के.फूटची ग्रामपंचायत इमारत उभारण्यात आली. मोठ्या प्रमाणात गावचा विकास झाला. माझ्या फ़ंडातून ४० लाख रुपये या इमारतीसाठी दिले आहेत. गावातील रस्ते, नळपाणी योजना, बंधारा, स्ट्रीट लाईट, सबस्टेशनवरून विद्युत पुरवठा, महामार्ग अंडरपास अशी अनेक कामे मार्गी लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत म्हणाले, पावशी जि. प. मतदारसंघात काम करताना खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, पालकमंत्री उदय सामंत, आ. दीपक केसरकर यांनी भरघोस निधी दिल्यानेच पावशी गाव विकास कामात अग्रेसर राहिला. विरोधकांना आम्ही काय मॉडेल आहोत ते दाखवून दिले, असे त्यांनी सांगितले.

सरपंच बाळा कोरगावकर म्हणाले, आपण निवडणूक रिंगणात उतरल्या नंतर माझ्या गावच्या ग्रामस्थांनी एक हाती सत्ता मिळवून दिली. आमचे खासदार, आमदार यांच्याकडे ज्या ज्या वेळी निधीची मागणी केली, त्या त्या वेळी त्यांनी आवश्यक निधी कमी पडू दिला नाही. त्यामुळेच ५ वर्षात विकासाची गंगा गावात आणली गेली असे सांगितले. या कार्यक्रमानिमीत्त पावशी गावातील माजी सरपंच, माजी सैनिक, बचत गट अध्यक्ष, सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अपंगांचा देखील सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर कन्या रत्न लाभलेल्या महिलांचा सत्कार व त्यांच्या नावे ग्रामपंचायतच्या माध्यमातून एफ. डी. काढण्यात आली.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जि. प. गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, छोटू पारकर, अवधूत मालणकर, सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच दीपक आंगणे, नेरूर सरपंच शेखर गावडे, हुमरस सरपंच अनुप नाईक, सरंबळ सरपंच सौ. साटम, हुमरमळा सरपंच जान्हवी पालव, पिंगुळी सरपंच सौ. पालकर, अणाव सरपंच आप्पा मांजरेकर, आवळेगाव सरपंच सुनील सावंत, शिवापूर सरपंच यशवंत कदम, पाट सरपंच रीती राऊळ सीमा खोत, चित्रा पावसकर, वैशाली पावसकर, यशश्री तेली, भाग्यश्री पावसकर, सागर भोगटे, प्रसाद शेलटे, दिनेश वारंग, अनुजा तेंडुलकर, सुचित्रा तुळसुलकर, प्रणिता नाईक, उत्तरा धुरी आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!