मसुरे डांगमोडेत आढळले प्राचीन शिवलिंग ; ग्रामस्थांनी केली विधिवत प्रतिष्ठापना
मालवण : मसुरे डांगमोडे मार्गाचीतड येथील सड्यावर प्राचीन असे शेषधारी शिवलिंग आढळून आले आहे. महाशिवरात्री पासून चर्चेत असलेल्या या शिवलिंगाच्या परिसराची ग्रामस्थांनी स्वच्छता करून या शिवलिंगाची पारंब्यापासून मुक्तता केली. त्यानंतर म्हणजेच आकारी ब्राह्मणस्थळावर श्रद्धापूर्वक त्याची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्याला शेकडो भाविकांनी उपस्थिती दर्शवित या सोहळ्याचा ‘याची देही याची डोळा’ आनंद लुटला.
दारू बंदीचा पुरस्कर्ता म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या मालवण तालुक्यातील जागृत देवस्थान असणाऱ्या डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डांगमोडे मार्गाचीतड येथील सड्यावर एका वटवृक्षा खाली महाशिवरात्रीच्या सुमारास मिश्र धातूची शेषधारी पिंडी आढळून आली होती. ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले त्याचठीकाणी श्री देव रवळनाथ यांच्या राठीतील आकारी ब्राम्हण, जैन ब्राह्मण, गायगोठण आणि खराडो ब्राम्हण अशी देवस्थाने आहेत. याठिकाणी दरवर्षी रितीरिवाजा नुसार देवस्थानचे मानकरी आणि ग्रामस्थ ब्राम्हण भोजन घालतात. महाशिवरात्रीच्या नंतर दोन दिवसांनी गावातील देवस्थानचे मानकरी व ग्रामस्थ हे सड्यावर असणाऱ्या आकारी ब्राह्मणाच्या ठिकाणी ब्राम्हण भोजन घालण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना भल्यामोठ्या वटवृक्षाच्या आतमध्ये प्राचीन असे शिवलिंग आढळून आले. त्या ग्रामस्थांनी ही गोष्ट देवस्थानच्या मानकऱ्यांना सांगितली. त्यानंतर देवस्थानच्या मानकऱ्यांनी त्या ठिकाणी जात त्या शिवलिंगाची पाहणी केली. या पाहणीत वटवृक्षाच्या आतमध्ये सुमारे सव्वा फूट उंचीचे शेषधारी शिवलिंग त्यांच्या निदर्शनास पडले. शिवलिंगाच्या अर्थात पिंडीकेच्या पृष्ठभागावर बेलाच्या पानाचे चित्र होते तर अग्रभागावर त्रिनेत्राचे चिन्ह होते. मिश्र धातूचे असणारे हे शिवलिंग पुरातन असल्याचे देवस्थानचे मानकरी प्रकाश गंगाराम ठाकूर व इतर मानकऱ्यांनी सांगितले. यापूर्वी या वडाच्या झाडाला दोन वेळा आग लागली होती. मात्र वटवृक्षाच्या आतमध्ये असणारे हे शिवलिंग काही दिसले नव्हते. परंतु महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी लागलेल्या आगीच्या वणव्यात या वटवृक्षाचा काही भाग जळल्यानंतर हे शिवलिंग दृष्टिपथास पडल्याचे श्री. ठाकूर यांनी सांगितले. ही माहिती देतानाच श्री. ठाकूर यांनी डांगमोडे मार्गाचीतड येथे श्री देव रवळनाथाच्या कार्यक्षेत्रात सापडलेल्या या शिवलिंगाबाबत सोशल मीडियावर काही विपर्यास्त माहिती देण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
गुरुवारी सकाळी डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ देवस्थानचे मानकरी आणि गावकऱ्यांनी रवळनाथ मंदिरात एकत्र येत श्री देव रवळनाथा समोर गाऱ्हाणे घालून झाल्यानंतर ग्रामस्थांनी डांगमोडे गावच्या सड्यावरील श्री देव आकारी ब्राह्मणाच्या स्थळाकडे कूच केली. त्यानंतर त्याठिकाणी वटवृक्षाच्या पारंब्यानी जखडलेल्या शिवलिंगाला बाहेर काढून त्याच ठिकाणी त्याची देवस्थानचे मानकऱ्यांपैकी अजित अनिल ठाकूर यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. या धार्मिक कार्याचे पौरहित्य सुरेश जोशी यांनी केले. यावेळी शेकडो भाविक उपस्थित होते. जवळपास पाचतास चाललेल्या या सोहळ्याचा उपस्थित भाविकांनी याची देही याची डोळा आनंद लुटला.