महाड मध्ये सिंधुदुर्गातील राणे समर्थकांच्या गाडीवर दगडफेक !
महाड चौकातील घटना ; ५०० हून अधिक शिवसैनिकांचा जमाव
कुणाल मांजरेकर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून महाड येथे नेण्यात आले आहे. त्यामुळे राणेंच्या समर्थनार्थ राज्यभरातील भाजपा कार्यकर्ते आणि राणे समर्थक महाडच्या दिशेने रवाना झाले असून महाड येथील मुख्य चौकात सिँधुदुर्गातील राणे समर्थकांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना घडल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे. या ठिकाणी ५०० हून अधिक शिवसैनिकांचा जमाव असून महिलांच्या आडून त्यांच्याकडून अंधारात राहून दगडफेक आणि लाठ्या काठ्या फेकण्यात येत असल्याचा आरोप राणे समर्थकांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वादग्रस्त वक्तव्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संगमेश्वर येथून पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांच्यावर महाड येथे पहिला गुन्हा दाखल झाल्याने त्यांना महाड पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. राणे यांच्या समर्थनार्थ राज्यभरातील राणे समर्थक महाडला पोहोचले असून सिंधुदुर्गातील राणे समर्थकांच्या गाडीवर काही वेळापूर्वी महाडच्या चौकात दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. सिंधुदुर्गातील आनंद शिरवलकर, विजय इंगळे, सागर राणे यांसह अन्य भाजपा कार्यकर्ते महाड येथे जात असताना त्यांच्या गाडीवर ही दगडफेक झाली आहे. याठिकाणी ५०० हून अधिक शिवसैनिक असून पोलीस प्रशासन संबंधितांवर कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप राणे समर्थकांनी केला आहे. महिलांच्या आड राहून शिवसैनिकांकडून अंधारातून दगडफेक करण्यात येत असून हिंमत असेल तर आमने-सामने या, असे आव्हान राणे समर्थकांनी दिले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा राजकीय तणाव वाढला आहे.