वरुण सरदेसाईंवर एफआयआर दाखल ; पोलिसांना शिवीगाळ भोवली !
मुंबई : राणेंच्या जुहू येथील बंगल्या बाहेर शिवसेनेने काढलेल्या मोर्चावेळी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. यावेळी युवासेनेचे सचिव आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई हे पोलिसांना अश्लिल शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांनी वरुण सरदेसाई यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यात शिवसेनेने राणेंच्या घराबाहेर आंदोलन केले. यावेळी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येने युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी याठिकाणी सौम्य लाठीचार्ज केला. यावेळी काही प्रमाणात दगडफेकही झाली. याचवेळी झालेल्या गोंधळात युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता वरुण सरदेसाई यांच्यावर मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांनी एका निवेदनात म्हटलं की, पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला. आता त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या वरुण सरदेसाईंविरोधातही एफआयआर दाखल करावा. तसेच, वरुण सरदेसाई यांच्यावर कारवाई न केल्यास भाजप युवा मोर्चाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.