ब्लॉग आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायला शिका !

सिंधुदुर्ग महाविद्यालयात आयोजित ‘ब्लॉग लेखन आणि मी’ व्याख्यानात ऋषी देसाई यांचे प्रतिपादन

मालवण : विद्यार्थ्यांनी ब्लॉगवर व्यक्त व्हायला शिकले पाहिजे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी मांडत राहिल्या पाहिजेत. कितीतरी अशा गोष्टी असतात की ज्यावर कुणाला तरी माहिती हवी असते. कोणी तरी अभ्यास करत असतो, ते त्या गोष्टी शोधत असतात. त्यांना वेळ असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या ब्लॉग मधून त्यांना मिळतात. म्हणून आपण सतत व्यक्त होत राहिले पाहिजे. आपल्या हातात सोशल मीडियाचे मोठे व्यासपीठ आहे. त्याचा वापर आपण केला पाहिजे, असे प्रतिपादन लोकशाही चॅनलचे प्रख्यात वृत्तनिवेदक ऋषी देसाई यांनी येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील ‘ब्लॉग लेखन आणि मी’ या व्याख्यानावेळी केले.

तृतीय वर्ष कला शाखेच्या अभ्यासक्रमात ब्लॉग लेखन या विषयाचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना ब्लॉग लेखन म्हणजे काय, त्याची सुरुवात कशी करावी, त्याची उपयुक्तता काय इत्यादी गोष्टी प्रत्यक्षात समजाव्यात या उद्देशाने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या मराठी विभागाने नरहरी झांट्ये सभागृहात शनिवारी या व्याख्यानाचे आयोजन केले होते. ब्लॉग का लिहायचा, त्याचे विविध उद्देशांवर आधारित दहा प्रकार, ब्लॉगिंगचा इतिहास, इत्यादी विषयी ऋषी देसाई यांनी अनेक उदाहरणे देऊन सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना या विषयावर मार्गदर्शन केले. मालवण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ब्लॉग लेखकांचा, व्हिडिओ ब्लॉगिंग करणाऱ्या मंडळींचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.

ह्या तुका सुचता कसा, हा ऋषी देसाई यांच्या बद्दलचा सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा खरा ठरवत ऋषी देसाई यांनी विद्यार्थ्यांसह, सर्व प्राध्यापक आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे २००२ च्या बॅचचे माजी विद्यार्थी असणाऱ्या ऋषी देसाई यांनी आपल्या कॉलेज जीवनातली सोनेरी दिवसाच्या आठवणी देखील जागवल्या. कॉलेजचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा पण सगळ्यात छोटा कालावधी आपल्याला मिळतो, तो काही केले तरी परत येत नाही, त्याचा पुरेपूर उपयोग करा, असे आवाहन देखील त्यांनी विद्यार्थ्यांना केले. आपल्या व्याख्यानात गरुडाच्या एका खिळवून ठेवणाऱ्या गोष्टीतून त्यांनी आजच्या शिक्षणपद्धती बद्दल मार्मिक भाष्य केले.

मराठी विभाग प्रमुख प्रा. कैलास राबते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रभारी प्राचार्य डॉ. रामचंद्र काटकर यांनी ऋषी देसाई यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. डॉ. काटकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छापर मनोगत व्यक्त करून सर्वांचे स्वागत केले. डॉ. सुमेधा नाईक यांनी मा. ऋषी देसाई यांचा सविस्तर परिचय करून दिला, तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. एच. एम. चौगले यांनी अतिथिंचे तसेच सर्व उपस्थितांचे आभार मानले. महाविद्यालयातील विद्यार्थी वर्ग, ज्युनिअर आणि सिनियर विभागांचे सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग या व्याख्यानासाठी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!