राणेकुटूंबाच्या यशात श्री भराडी मातेचा मौलिक वाटा ; निलेश राणेंची प्रांजळ कबुली

श्री भराडी देवीचे घेतले दर्शन ; आंगणेवाडीसाठी आमच्याकडून जे काही हवंय त्यासाठी हक्काने हाक मारण्याची विनंती

कुणाल मांजरेकर

आंगणेवाडी : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधून शनिवारी देवीचे दर्शन घेतले. यावेळी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. आम्ही राणे कुटुंबाने राजकारण आणि समाजकारणात जे यश मिळवलं आहे, ते भराडी देवीच्या आशीर्वादामुळे ! असं सांगतानाचं आंगणेवाडीसाठी आमच्याकडून जे काही हवंय त्यासाठी हक्काने हाक मारा, अशी विनंती निलेश राणे यांनी ग्रामस्थ मंडळाला केली.

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक जत्रा २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी शनिवारी आंगणेवाडीत भेट देऊन श्री भराडी देवीचे आशीर्वाद घेतले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, दीपक आंगणे, बाबू आंगणे, सीताराम आंगणे, जयंत आंगणे, वसंत आंगणे, बाळा आंगणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी बाळा आंगणे यांनी निलेश राणे यांचे स्वागत करतानाच आंगणेवाडीच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिलेल्या भरीव योगदानाची माहिती दिली. यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले, भराडी देवीच्या यात्रेचे महत्व काय, हे आम्हाला राणे कुटुंबाला वेगळं सांगायची गरज नाही. राणे कुटुंबाचं आमच्या राजकिय वाटचालीत काय योगदान आहे, ते आम्ही कधीही विसरलेलो नाही. म्हणूनच दरवर्षी प्रमाणे यंदाही आंगणेवाडीत येऊन भराडी आईचे दर्शन आपण घेतल्याचे निलेश राणे म्हणाले. मी स्वतः तुमच्या कुटुंबाचा एक भाग आहे, त्यामुळे आंगणेवाडीचा विषय आला की आमचे जे योगदान आहे, ते देण्याचा आम्ही नेहमी प्रमाणे करतो. त्यामुळे आंगणेवाडीसाठी जे काय हवंय, त्यासाठी कधीही हक्काने हाक मारा. स्वतः राणेसाहेब तुमच्या सोबत आहेत, असेही ते म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!