उत्तरप्रदेशमध्ये प्रचाराला जाण्यासाठी पालकमंत्र्यांनी आंगणेवाडीकडे फिरवली पाठ
जनतेला वार्यावर सोडणारे विकास काय करणार ? अमित इब्रामपूरकर यांचा सवाल
मालवण : मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पालकमंत्र्यांना आंगणेवाडी यात्रेबद्दल आस्था नाही ही मनसेची टीका खरी ठरली आहे. जत्रेदिवशी जिल्ह्यातील जनतेला वार्यावर सोडून पालकमंत्री उत्तरप्रदेश मध्ये निवडणुक प्रचारासाठी फिरत असल्याचे पाहावयास मिळत आहे, अशी टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.
श्री. इब्रामपूरकर यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, जत्रेच्या दिवशी उत्तरप्रदेश मध्ये निवडणुक प्रचारासाठी जायचे असल्याने पालकमंत्री उदय सामंत यांनी आंगणेवाडीत किंवा मालवण तालुक्यात नियोजन बैठक न घेता ती कुडाळ मध्ये घेतली हे आता स्पष्ट होत आहे. आंगणेवाडी वार्षिक उत्सवाची सर्व तयारी आंगणे कुटुंब , ग्रामस्थ, प्रशासन, व्यापारी यांनी केली. चोख नियोजन करून यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळे आंगणेवाडी यात्रेबाबत कोणतीही आस्था पालकमंत्री उदय सामंत यांना नाही. आंगणेवाडी यात्रेपूर्वी नियोजन बैठक आंगणेवाडीत न घेणारा पहिलाच पालकमंत्री आहे. आंगणेवाडी ग्रामस्थ, प्रशासन, व्यापारी यांच्यासोबत आंगणेवाडीत अथवा मालवण तालुक्यात बैठक घेऊन जनमत जाणून घेणे गरजेचे असताना तसे न करता कुडाळ येथे स्वतःच्या सोयीने बैठक घेऊन हुकूमशाही पद्धतीने पालकमंत्री उदय सामंत यांनी यात्रेवर निर्बंध लादले, अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली होती. ती आता खरी ठरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेला वार्यावर सोडणारे पालकमंत्री जिल्ह्याचा विकास काय करणार ? असेही अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.