सिंधुदुर्गात २०० कोटी खर्चून एमएसएमई तंत्रज्ञान केंद्र स्थापन होणार

ना. नारायण राणेंची घोषणा ; एमएसएमई परिषदेचे उद्घाटन

कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात एमएसएमई तंत्रज्ञान केंद्र स्थापन करणार असल्याची घोषणा केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाने आयोजित केलेल्या एमएसएमई परिषदेच्या उद्घाटनपर सत्रात ते आज बोलत होते. यावेळी केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाचे सचिव बी. बी. स्वेन, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना, एमएसएमई मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि विकास आयुक्त शैलेश कुमार सिंग, कॉयर बोर्डचे अध्यक्ष डी. कुप्पूरामु तसेच मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग येथे सुमारे २०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या एमएसएमई- तंत्रज्ञान केंद्र उद्योग क्षेत्रामध्ये विशेषतः एमएसएमई उद्योगांमध्ये स्पर्धात्मकता वाढवेल तसेच त्या उद्योगांच्या परिसरातील रोजगार मिळविणाऱ्या तसेच बेरोजगार युवकांची रोजगारविषयक पात्रता वाढविण्यासाठी त्यांना तंत्रज्ञान तसेच त्याचे अंतःपोषण याविषयी सल्लावजा पाठबळ पुरवतील, असे ना. राणे म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला देशात पर्यटनासोबतच, औद्योगिक क्षेत्रातही अव्वल स्थानी आणणे हा या परिषदेचा उद्देश आहे. उद्योगांच्या मदतीने स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे सांगत, ना. राणे यांनी पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश लोकांना नोकरी धंद्यासाठी मुंबईला जावे लागे आणि या चाकरमान्यांनी पाठवलेल्या पैशांवरच इथल्या लोकांचा चरितार्थ चालत असे, अशी आठवण सांगितली. आता मात्र, ही परिस्थिती बदलायची असून आपल्याला इथेच रोजगाराच्या संधी आणि पैसा उभा करुन त्या आधारावर आपल्या पुढच्या पिढीला शिक्षित करायचे आहे, यावर त्यांनी भर दिला.

या परिषदेला उपस्थित असलेल्या मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी मंत्रालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देणारे सादरीकरण केले. या सादरीकरणासाठी ग्रामीण तसेच निम-शहरी भागातील अनेक उद्योजक आणि युवक उपस्थित होते.

या बैठकीला संबोधित करताना केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, “निर्यात, उत्पादनांचा दर्जा तसेच स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान या बाबतीत देशभरातील एमएसएमई उद्योगांना नव्या उंचीवर घेऊन जाऊन एक मापदंड निर्माण करण्यावर तसेच देशभरात कार्यरत असलेल्या एमएसएमई उद्योगांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविण्यावर त्यांच्या मंत्रालयाने सध्या लक्ष केंद्रित केले आहे. याच दिशेने अधिक प्रगती करत मंत्रालय एमएसएमई क्षेत्राला प्रोत्साहन देणारे अनेक महत्त्वाचे उपक्रम हाती घेत आहे आणि देशातील एमएसएमई उद्योगांच्या समग्र समावेशक विकासासाठी सुलभ कर्ज पुरवठा, क्षमता निर्मिती आणि कौशल्यविषयक प्रशिक्षण, बाजारांशी सोप्या पद्धतीने जोडणी, तंत्रज्ञानाचे अद्यायावतीकरण इत्यादी उपक्रम सक्रीयतेने राबविण्यासाठी पुढाकार घेत आहे, या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. ते पुढे म्हणाले की, अशा प्रकारच्या परिषदा या उद्योजक, धोरणकर्ते आणि इतर भागधारकांना उत्तम माहिती, नाविन्यपूर्ण कल्पना यांच्या देवाणघेवाणीसाठी तसेच व्यवसाय करण्याच्या संधी शोधण्यासाठी खुली चर्चा करण्याचा अत्यंत महत्त्वाचा मंच पुरवत आहेत.

कोकण विभागासाठी मंत्रालयाने हाती घेतलेल्या उपक्रमांचे कौतुक करून केंद्रीयमंत्री राणे म्हणाले की, महाराष्ट्रात विशेषतः कोकण भागात रोजगार निर्मितीसाठी प्रचंड वाव आहे. कोकणात पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्फूर्ती अर्थात पारंपारिक उद्योगांच्या पुनरुत्थानासाठी निधी पुरवठा योजना, मधु अभियान आणि कुंभार सशक्तीकरण योजना यांच्यासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या कडक अंमलबजावणीतून उद्योजकता आणि रोजगार निर्मिती यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. २०१६ पासून आतापर्यंत कोकणात दोन हजारहून अधिक नव्या उत्पादन एककांची उभारणी करून मंत्रालयाने उद्योजकतेला मोठी चालना दिली आहे आणि त्यातून तब्बल १६,४०० प्रत्यक्ष रोजगार निर्माण झाले आहेत. या प्रकल्पांना मदत करण्यासाठी एमएसएमई मंत्रालयाने अनुदानापोटी ७१.६५ कोटी रुपयांची रक्कम वितरीत केली आहे, असे ते म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!