… म्हणून निलेश राणेंना कुडाळ- मालवण मधून आमदार म्हणून द्या
आंगणेवाडीच्या व्यासपीठावरून आमदार नितेश राणेंची साद
कुणाल मांजरेकर
आंगणेवाडी : केंद्रीयमंत्री राणे साहेबांच्या माध्यमातून आंगणेवाडीत आजपर्यंत कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली आहेत. मात्र अद्यापही या ठिकाणी विकास कामे प्रलंबित असून या कामांच्या पूर्ततेसाठी राणे साहेबांकडे कोणत्या तोंडाने जाऊ ? असा प्रश्न आज आंगणेवाडी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. आज देवगड, कणकवली, वैभववाडी मतदार संघात विकासाची गंगा आली आहे. त्याच प्रमाणे या भागातही विकासाची गंगा आणण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत कुडाळ – मालवण मतदार संघातून निलेश राणे यांना निवडून द्या, अशी साद आमदार नितेश राणे यांनी आंगणेवाडीच्या व्यासपीठावरून उपस्थितांना घातली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या समवेत आमदार नितेश राणे यांनी आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीचे दर्शन घेतले. त्यावेळी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, राणे कुटुंबाला आजपर्यंत यश मिळाले ते भराडी देवीच्या आशीर्वादामुळे मिळाल्याची आमची भावना आहे. आज राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास होत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या भागातून भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधींनी निवडून आले तर या जिल्ह्याचा विकास कोणी थांबवू शकत नाही. आज कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघातून आमदार म्हणून मी प्रतिनिधित्व करत आहे. भविष्यात कुडाळ मालवण मधून निलेश राणे यांच्या रुपाने हक्काचा आमदार दिलात तर तुमचे कुठलेही प्रश्न शिल्लक राहणार नाहीत, असे नितेश राणे म्हणाले.