राणेंच्या “एमएसएमई” मार्फत उद्योजक, नवउद्योजकांना पर्वणी ; २५ फेब्रुवारीला ओरोस येथे मार्गदर्शन मेळावा
भाजपा उद्योग- व्यापार आघाडी जिल्हा संयोजक विजय केनवडेकर यांची माहिती
२६ फेब्रुवारी रोजी एसटी- एनटी प्रवर्गातील उद्योजकांचा कणकवलीत मेळावा
मालवण : केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग खात्यामार्फत १२०० उद्योग समाविष्ट आहेत. यात नाविन्यपूर्ण उद्योग कुठले आहेत, याची जिल्हावासीयांना माहिती देण्याच्या उद्देशाने २५ फेब्रुवारी रोजी ओरोस येथील शरद कृषी भवन येथे सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत जिल्ह्यातील उद्योजक, नवउद्योजक आणि अन्य व्यावसायिकांसाठी नाविन्यपूर्ण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा सर्वांसाठी खुला असून या मेळाव्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपच्या उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हा संयोजक विजय केनवडेकर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
येथील भाजप कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सूक्ष्म, लघु, मध्यम या खात्यामार्फत सहा ते सात महिन्यांत विविध योजना जिल्ह्यात कार्यान्वित केल्या जाणार आहेत. तरुण, महिला उद्योग क्षेत्रात कसे वळतील यासाठी जिल्ह्यात या योजनांची माहिती देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेत ४५ टक्के हिस्सा या मंत्रालयाचा असतो. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगात समाविष्ट बाराशे उद्योगांची माहिती जिल्हावासीयांना, कोकणवासीयांना मिळावी या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नव उद्योजक, उद्योजक यांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन श्री. केनवडेकर यांनी केले आहे.
२६ रोजी कणकवलीत मेळावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंचित लोकांसाठी खास योजना भारत सरकार मार्फत राबविण्याचे निश्चित केले आहे. यात एससी एनटी मधील जे उद्योजक आहेत, नवीन उद्योग करु पाहतात. विविध छोट्या छोट्या व्यवसायातून सेवा देणाऱ्या या सर्व उद्योजकांसाठी २६ फेब्रुवारी रोजी कणकवली येथील प्रहार भवन येथे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय अंतर्गत नॅशनल एससी एनटी हब, नॅशनल स्मॉल इंडस्ट्री कॉर्पोरेशन, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा होणार आहे. कोकणात प्रथमच हा मेळावा होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे तर या कार्यक्रमास दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे हे उपस्थित राहणार आहेत. काही जणांना या वेगळ्या उपक्रमाबाबत संभ्रम होऊ शकतो. मात्र नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या धोरणानुसार एससी, एनटी व्यावसायिकांचा उत्पादित केलेला माल हा सरकार दरबारी विकत घेतला पाहिजे अशी प्रमुख अट घातली आहे. याचा फायदा एसी, एनटी उद्योजकांना कसा होणार याची माहिती या मेळाव्यात देण्यात येणार आहे. दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांनी याबाबत नोंदणी अर्ज प्रसिद्ध केला आहे. व्यवसाय समजून त्याला कुठल्या क्षेत्रात माल देऊ शकू याचे मार्गदर्शन या मेळाव्यात करण्यात येणार आहे. २६ रोजी होणाऱ्या मेळाव्यात गोवा शिपयार्ड कंपनी, कोकण रेल्वे, सर्व बँक प्रतिनिधी, फार्मासिटिकल कंपनी या कंपन्यांचे विविध स्टॉल लागणार असून यात आपण कुठली सर्विस किंवा उत्पादित वस्तू त्यांना देऊ शकतो याची समोरासमोर बोलणी उद्योजकांना करता येणार आहे. जिल्ह्यातील एससी, एनटी उद्योजकांना ही सुवर्ण संधी असून या मेळाव्यात जिल्ह्यातील एससी, एनटी मधील यशस्वी दहा उद्योजकांचा श्री. कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या मेळाव्यात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाचे सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती श्री. केनवडेकर यांनी दिली.